
दिल्लीतील निजामुद्दीन परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बॉलीवूड अभिनेत्री हुमा कुरेशीचा चुलत भाऊ आसिफ कुरेशीची हत्या करण्यात आली. स्कूटीच्या पार्किंगवरून झालेल्या छोट्या वादाचे रूपांतर हत्येत झाले. या घटनेमुळे बॉलीवूडमध्ये तसेच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या पोलीस या घटनेची चौकशी करत असून दोघांना ताब्यात घेतले आहे.
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना गुरुवारी (7 ऑगस्ट ) रात्री 11 वाजताच्या सुमारास घडली. गुरुवारी रात्री आसिफ कुरेशी आणि परिसरातील काही लोकांमध्ये पार्किंगवरून भांडण झाले. आसिफने आरोपींना घराच्या गेटबाहेर स्कूटर पार्क करू नका असे सांगितले होते, परंतु त्यांनी ते ऐकले नाही. यामुळे वाद सुरू झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, रागाच्या भरात आरोपींने आसिफवर धारदार शस्त्राने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले.
आरोपीने केलेल्या या हल्ल्यात आसिफ कुरेशी गंभीर जखमी झाला होता. त्यामुळे त्याला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले. मात्र रुग्णालयात नेताच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी तातडीने चौकशी सुरु केली आणि या प्रकरणातील दोघांना ताब्यात घेतले आहे. सध्या पोलीस या प्रकरणाची चौकशी केली जात आहे.
आसिफ कुरेशीच्या पत्नीने सांगितला प्रसंग
मृत आसिफ कुरेशीच्या पत्नीने घडलेल्या प्रकारावर भाष्य़ केलं. शेजारच्या एका मुलाने रात्री 9.30 -10 च्या सुमारास घराबाहेर त्याची स्कूटर पार्क केली होती. तेव्हा आसिफ त्याला म्हणाला, बेटा गाडी थोडी पुढे पार्क कर, पण त्या मुलाने शिवीगाळ करायला सुरुवात केली आणि धमकी द्यायला लागला. तो मुलगा वरून खाली आला आणि त्याने आसिफच्या छातीवर धारदार वस्तूने वार केले. त्याचा भाऊही त्याच्यासोबत आला होता. आसिफच्या छातीतून खूप रक्तस्त्राव होऊ लागला. तेव्हा मी ताबडतोब माझा दीर जावेद याला घरी बोलावले, पण तोपर्यंत आसिफचा मृत्यू झाला होता, असे तिने सांगितले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.