Kailash Waghmare कम्फर्ट झोन तोडायला आवडतो…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नाटक, सिनेमा, वेब सीरिज असा सर्वत्र संचार करणारा युवा अभिनेता कैलाश वाघमारे त्याचा ‘गाभ’ हा नवीन सिनेमा घेऊन येत आहे. या निमित्ताने त्याच्याशी साधलेला संवाद…

ग्रामीण बाजाचेच सिनेमे करायचे असे काही तू ठरवले आहेस का?

 – नाही, मी असे काही ठरवलेले नाही. मुळात मी एक अभिनेता आहे आणि मला ‘व्हर्सटाइल रोल’ करायला आवडतात. माझ्याकडे जे सिनेमे येतात, त्यातले जे चांगले रोल आहेत ते मी करतो. त्या वेळी माझा अट्टहास असा असतो की, तो रोल मी करायलाच हवा. मला कुठल्याही वेगळय़ा बाजाची भूमिका करायला मिळाली तरी निश्चितच आवडेल. ग्रामीण बाजाचेच सिनेमे करायचे असे काही नाही. कदाचित मी माझ्या ‘कम्फर्ट झोन’मध्ये खेळतोय असे वाटत असेल, तर ते तसे अजिबात नाही. तसे असते तर मी इंग्रजी नाटक केले नसते. मला माझाच ‘कम्फर्ट झोन’ तोडायला खूप आवडतो. मुळात मी जिथून आलो आहे, तिथेच मी माझा पहिला ‘कम्फर्ट झोन’ तोडला आहे. यामुळे आपण प्रवाही आणि फ्रेश राहतो. आपण काळासोबत चालायला हवे. जो तसे जुळवून घेत नाही तो मागे पडतो.

 ‘गाभ’ असे आगळे शीर्षक असलेल्या तुझ्या या चित्रपटाचे सांगणे काय आहे? 

– ‘गाभ’ म्हणजे गर्भ! ‘गाभ’ हा शब्द प्राण्यांशी रिलेटेड आहे. आमच्या सिनेमात ‘गाभ’ वेगळय़ा अर्थाने वापरला गेला आहे. यातली ‘दादू’ ही मध्यवर्ती भूमिका मी साकारली आहे आणि त्याच्या अंतर्मनात असलेला गर्भ, असा सूचक अर्थ त्याला आहे. त्याच्या विचारांमधला जो गर्भ आहे, तो वाढत वाढत चालला आहे आणि त्यावर नक्की काय इलाज होऊ शकतो किंवा तो तसाच त्याला वाढवत न्यायचा आहे का, अशी याची पार्श्वभूमी आहे. यातल्या व्यक्तिरेखेच्या अंतर्मनातला जो गाभ आहे, त्याच्याकडे तो कसा पाहतो याची ही गोष्ट आहे. कधीकधी आपले दुःख काही काळाने छान वाटायला लागते. कुणीतरी आपल्याला सहानुभूती देते, पण सहानुभूतीपोटी जर आपण दुःख कुरवाळत बसायला लागलो, तर आयुष्य त्यातच निघून जाते.

 मराठी नाटकांमध्ये तू पुन्हा केव्हा दिसणार? 

– सध्या माझी हिंदी आणि इंग्रजी नाटके रंगभूमीवर सुरू आहेत. त्यातही मी सिनेमा करतो आणि वेब सीरिजही करतो. त्यात मला स्वतःचे छंद जोपासायचे आहेत. ‘शिवाजी अंडरग्राउंड…’ नाटकाला सध्या मी रिप्लेसमेंट दिली आहे, जेणेकरून माझ्यामुळे नाटक थांबता कामा नये. मध्यंतरी एका मान्यवर दिग्दर्शकांनी मला नाटकासाठी विचारलेही होते आणि मी त्यांना होकारसुद्धा दिला होता, पण एकंदर तारखांची कसरत लक्षात घेता, सध्या तरी ते शक्य वाटत नाही, पण मी मराठी नाटक नक्कीच करणार आहे.