49 जणांच्या पत्राला 61 जणांचे उत्तर, पत्रात म्हटले हा देशाविरूद्धचा कट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
kangana

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

देशातल्या 49 प्रथितयश नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहलं होतं. जमावाकडून होणाऱ्या मारहाणीत मुसलमान आणि अल्पसंख्यकांचे बळी जात असल्याचबद्दल या पत्रात चिंता व्यक्त करण्यात आली होती. या पत्राला उत्तर देत 61 प्रथितयश नागरिकांनी पंतप्रधानांनाच उद्देशून पत्र लिहिलंय. या पत्रामध्ये तक्रार करणाऱ्यांवर सडकून टीका करण्यात आली आहे.

ज्या 49 जणांनी पत्र लिहिले आहे त्यांनी काही ठराविक घटना आणि खोट्या माहितीचा आधार घेत ते लिहिले असल्याचं 61 जणांनी लिहलेल्या पत्रात म्हटलं आहे. या पत्रावर सही करणाऱ्यांमध्ये कंगना रणौत, गीतकार प्रसून जोशी, नर्तिका सोनल मानसिंह,चित्रपट निर्माते मधूर भांडारकर आणि विवेक अग्निहोत्री यांचा समावेश आहे.

या पत्रात म्हटलंय की गरीब, निष्पाप आदिवासींमध्ये नक्षलवाद्यांनी दहशत पसरवली, कश्मीरमध्ये फुटीरतावाद्यांनी शाळांना आगी लावल्या, दहशतवाद्यांप्रमाणेच विद्यापीठामध्ये ‘भारत तेरे तुकडे होंगे’ च्या घोषणा दिल्या गेल्या तेव्हा ही मंडळी शांत होती. आता ही मंडळी देशाची प्रतिमा मलीन करण्यासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नकारात्मक चित्र जगाच्या डोळ्यासमोर उभे करण्याचा प्रयत्न करत असल्याचं या पत्रात म्हटलं आहे.

सरकारविरोधात बोलणाऱ्याला देशद्रोही ठरवले जात असल्याचा आरोप 49 जणांनी लिहलेल्या पत्रात केला होता. या आरोपाला 61 जणांनी लिहलेल्या पत्रातून उत्तर देण्यात आलं आहे. मोदी सरकारच्या काळात मतमतांतरांना अधिक मुभा दिली जात असून त्याचा फायदा घेत मोदी सरकारवर टीका करण्यासोबत दूषणे  दिली जात आहेत असं या पत्रात म्हटले आहे. ज्या लोकांनी पत्र लिहून मोदी सरकारवर टीका केली, त्यांना उद्देशून या पत्रात म्हटलंय की हा तर गोरगरीब, शोषित-वंचितांच्या जनादेशाचा अपमान करण्यासारखं आहे. त्यांच्या मनात भयाचे वातावरण निर्माण करून प्रगती पक्षावर असलेल्या हिंदुस्थानचा रथाच्या मार्गात अडथळे आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचंही या पत्रात म्हटलं आहे.