‘मदर इंडिया’, ‘कोहिनूर’ फेम प्रसिद्ध अभिनेत्री कुमकुम यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलिवूड अभिनेत्री कुमकुम यांचे निधन झाले आहे. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अभिनेते जॉनी वॉकर यांचे सुपुत्र नसिर खान यांनी ट्विटरवर कुमकुम यांच्या निधनाची माहिती दिली. त्यांच्या निधनाचे कारण अद्याप स्पष्ट करण्यात आले नाही, मात्र यामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.

‘मदर इंडिया’, ‘कोहिनूर’, ‘एक सपेरा एक लुटेरा’ ‘प्यासा’, ‘सीआयडी’, आणि ‘नया दौर’ या सारख्या चित्रपटातील कुमकुम यांच्या भूमिका विशेष गाजल्या. त्यांच्या निधनाची माहिती देताना नसिर खान यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.

जॉनी वॉकर आणि कुमकुम यांचा एक जुना फोटो शेअर करत त्यांनी म्हटले, ‘बॉलिवूड अभिनेत्री कुमकुम यांचे निधन झाले. मृत्यूसमयी त्या 86 वर्षांच्या होत्या. त्यांनी अनेक चित्रपट केले. वडील जॉनी वॉकर यांच्या सोबतही अनेक चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या.’ नसिर यांच्यासह नावेद जाफरी यांनीही ट्विट करून शोक व्यक्त केला.

अभिनेत्री कुमकुम यांनी 1954 ला ‘आर पार’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदर्पण केले होते. या चित्रपटात त्यांनी ‘कभी आर कभी प्यार लगा तीरे नजर’ या गाण्यावर नृत्य केले होते. या नंतर त्यांनी ‘राजा और रंक’, ‘गीत’, ‘आंखे’, ‘ललकार’, यासारख्या चित्रपटात अभिनय केला. तसेच भोजपुरी चित्रपट ‘गंगा मैया तोहे पियारी चढाईबो’ यातही त्यांनी काम केले. 1963 ला हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.