
कर्करोगाविरुद्धची लढाई जिंकल्यानंतर ज्येष्ठ अभिनेत्री नफिसा अली पुन्हा एकदा रुपेरी पडदा गाजवण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. करण जोहरच्या आगामी ‘रॉकी और रानी की प्रेमकहानी’ या चित्रपटात त्या झळकणार आहेत. याच महिन्याच्या अखेरीस त्या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे.
2018 मध्ये नफिसा यांना तिसऱ्या स्टेजचा कर्करोग असल्याचे निदान झाले होते. तेव्हापासून त्या चित्रपटसृष्टीपासून दूर होत्या. याबाबत नफिसा अली म्हणाल्या, माझी रोगप्रतिकारशक्ती खूपच कमी असल्यामुळे कुटुंबियांनी मला मुंबईला जाण्यास परवानगी दिली नव्हती. यामुळे मला अनेक चित्रपटांच्या ऑफरवर पाणी सोडावे लागले होते. पुढे त्या म्हणाल्या, सिनेमा हेच माझे पॅशन आहे. आता डॉक्टरांनी मला पूर्णपणे बरे केले आहे. परंतु तेदेखील पाच वर्षांपूर्वी मला 100 टक्के क्लीन चिट देऊ शकत नव्हते. मी आशेने जीवन जगतेय. मला विश्वास आहे की, मी पुन्हा उंच भरारी घेईन. ‘रॉकी और रानी की प्रेमकहानी’ या चित्रपटात नफिसा यांच्यासोबत ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र, अभिनेत्री जया बच्चनदेखील एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. यापूर्वी नफिसा आणि धर्मेंद्र यांनी लाईफ इन मेट्रोमध्ये एकत्र काम केले होते.


























































