इचलकरंजीतील यंत्रमागधारकांना अतिरिक्त वीजदर सवलत मंजूर, सुमारे 9700 ग्राहकांना मिळणार लाभ

electricity

यंत्रमाग ग्राहकास 27 एचपीच्या आतील वीज वापराच्या ग्राहकास प्रतियुनिट 1 रुपये व 27 एचपीच्या वर वीज वापराच्या यंत्रमाग ग्राहकास 75 पैसे इतकी प्रतियुनिट वीजदर सवलत घेण्यास ऑनलाइन नोंदणीची अट शिथिल केल्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यामुळे इचलकरंजीतील यंत्रमागधारकांना वार्षिक शंभर कोटी रुपयांचा लाभ होईल, अशी माहिती इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनने प्रसिद्धिपत्रकातून दिली आहे.

15 मार्च 2024 रोजी 27 एचपीखालील यंत्रमागधारकांना अतिरिक्त 1 रु.ची सवलत व 27 एचपीवरील यंत्रमागधारकांना अतिरिक्त 75 पैसे सवलतीचा शासननिर्णय झाला होता. मात्र, यासाठी ऑनलाइन नोंदणीची अट घातली होती. यातील जाचक अटीने नोंदणी पूर्ण होत नव्हती. त्यामुळे नोंदणी अट रद्द करा, अशी मागणी होत होती.

मंत्रिमंडळ बैठकीत यंत्रमागधारकांची ऑनलाइन नोंदणीची अट शिथिल करण्यात आली आहे. याचा लाभ इचलकरंजीतील 27 एचपीखालील 7165, आणि 27 एचपीवरील 2586 यंत्रमाग ग्राहकांना मिळणार आहे. या निर्णयामुळे फक्त इचलकरंजीच्या 27 एचपीखालील यंत्रमाग ग्राहकांच्या लाईट बिलापोटी प्रतिमहिना 2 कोटी 14 लाख व 27 एचपीवरील यंत्रमाग ग्राहकांचे 6 कोटी म्हणजे दोन्ही मिळून एकूण 8 कोटी रुपये इतकी बचत होणार आहे. तर, वार्षिक 100 कोटी इतकी बचत होणार आहे, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.