शहरांमधील रस्ते-वाहतूक समस्यांवर एकात्मिक नियोजनासाठी तज्ञांची समिती नेमावी, आदित्य ठाकरे यांची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातल्या मोठय़ा शहरांमधील लोकसंख्या वाढत आहे. त्यामुळे पुढील पन्नास वर्षांचा विचार करून रस्ते, फुटपाथ, वाहतूक व्यवस्था, वाहतूककोंडी सोडवण्याच्या दृष्टीने एकात्मिक नियोजनासाठी तज्ञांची समिती नेमण्याची मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार आदित्य ठाकरे यांनी आज विधानसभेत केली.

विधानसभा सदस्य सुनील टिंगरे यांनी पुण्यातील वाहतुकीच्या संदर्भात मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवरील चर्चेत आदित्य ठाकरे यांनी भाग घेतला. ते म्हणाले, आपण कधी सायकल ट्रक, बीआरटीएस तर कधी बस लेनच्या मागे जातो. अडीच वर्षांच्या काळात पर्यावरणमंत्री म्हणून काम करताना मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, कोल्हापूरमध्ये मला एक गोष्टी जाणवली की, शहरांची लोकसंख्या वाढत आहेत. त्यासाठी एकात्मिक नियोजन (इंटिग्रेटेड प्लॅनिंग) हा एक महत्त्वाचा विषय आहे. यामध्ये वेगवेगळय़ा एजन्सीनासोबत घेणे गरजेचे असते. जसे नागपूरमध्ये एमएमआरडीए. एनआयटी, एनएमसी आहेत. मध्यंतरी जी-20 परिषद झाली. यावेळी वाहतुकीची कोंडी व्हायला नको म्हणून पुणे मेट्रोचे काम काही दिवसांसाठी थांबवल्याची बातमी माझ्या वाचनात आली. पण जेव्हा वेगवेगळय़ा एजन्सी एकमेकांच्या अखत्यारित काम करतात तेव्हा थोडी अडचण निर्माण होते. मुंबईत आम्ही काही संस्थांसोबत फुटपाथ, रस्ते यांची रुंदी काय असावी तसेच वाहतूककोंडी दूर करायला एजन्सीची मदत घेतली होती. इतर ठिकाणीही हे सर्व करायला तज्ञांची मदत घेणार का? कारण वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन पुढील दहा-पंधरा वर्षांचा नव्हे, तर पुढच्या पन्नास वर्षांचा विचार करावा लागेल. म्हणूनच मुंबईत आम्ही 2027 पर्यंत दहा हजार बसेस घेण्याची योजना आखली आहे. त्यामध्ये मिनी बस असाव्यात अथवा डबल डेकर बस असाव्यात असा सर्वांचा विचार केला. राज्य सरकारही हा सर्व विचार करून काम करणार का, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.

त्यावर उत्तर देताना उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले की, हा विषय केवळ मुंबई किंवा पिंपरी-चिंचवडपुरता मर्यादित नाही. इतर शहरांचा विचार करता एकात्मिक नियोजनासाठी तज्ञांची समिती आवश्यक आहे तशी समिती नेमली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.