
मुंबईत चांगले रस्ते, फुटपाथ आणि कचरामुक्त करण्यावर भर दिला जाईल. केवळ मुंबईला नाही तर संपूर्ण राज्याला ‘ए प्लस’ करणार असल्याचा निर्धार राज्याचे पर्यावरण मंत्री व मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.
मुंबई उपनगर जिह्याचे पालकमंत्री झाल्यावर आदित्य ठाकरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी बैठक घेतली. 22 जानेवारीला होणाऱ्या जिल्हा नियोजन समिताच्या तयारीच्या दृष्टीने या बैठकीत चर्चा करण्यात आली. मुंबईच्या उपनगरातील वाहतूक कोंडी दूर करण्याबरोबरच पावसाळ्यात पाणी तुंबू नये यासाठी त्यांनी सूचना दिल्या.
मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरातील रहिवाशांना दिलासा देण्यासाठी पायाभूत सुविधा सुधारण्यावर भर देण्यात यावा. तसेच सरकारी यंत्रणांनी परस्परांमध्ये समन्वय साधून रस्ते, फूटपाथ, वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टीने कामे करण्याच्या सूचना आदित्य ठाकरे यांनी दिल्या. यावेळी परिवहन मंत्री ऍड. अनिल परब तसेच उपनगर जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर आदी उपस्थित होते.
वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उपाययोजना
मुंबईतील अनेक उपाययोजनांवर बैठकीत चर्चा झाली. मिसिंग लिंक डीपी यावर लक्ष केंद्रित करणार आहे. ईस्ट आणि वेस्ट जोडणीच्या परिसराचे सुशोभीकरण आणि रुंदीकरण करण्याचे ठरवले आहे. मेट्रोची काम सुरू असलेल्या ठिकाणी बेस्ट आणि पालिका यांची सांगड घालून मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
समिती गठीत करणार
उपनगरातील लोकसंख्या अधिक आहे. त्यामुळे सर्वांनी मिळून एक टीम म्हणून काम करणे गरजेचे आहे. इथे कोणीही ज्युनिअर किंवा सीनिअर नाही. पर्यावरणाला नुकसान न होता अधिक चांगले काम कसे करता येईल याचा प्रयत्न केला जाईल. यासाठी आम्ही समिती गठीत करणार असल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना दिली.
























































