
मुंबईचे आंतरराष्ट्रीय महत्त्व विचारात घेऊन शहरात विविध पायाभूत सुविधा प्रकल्प उभारण्यात येत आहेत. त्यासाठी दक्षिण मुंबईतील वाहतूक व्यवस्थापन सुरळीत होण्याच्या दृष्टीने बांधण्यात येणाऱ्या प्रस्तावित नरीमन पॉइंट- कफ परेड जोडरस्त्याची पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी शनिवारी पाहणी केली.
मुंबईत वाहनांची वाढणारी संख्या आणि विविध ठिकाणी होणारी वाहतूककोंडी लक्षात घेऊन रस्ते वाहतुकीसाठी मोठय़ा प्रमाणात पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यासाठी सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. दक्षिण मुंबईतील कफ परेड, कुलाबा परिसरात येणाऱ्या वाहनांची संख्या पाहता सध्या नरीमन पॉइंट तसेच मंत्रालय परिसरात वाहतूककोंडी निर्माण होते. याबाबत उपाययोजना करण्यासाठी एमएमआरडीएमार्फत नरीमन पॉइंट-कफ परेड जोडरस्ता प्रस्तावित आहे. या जोडरस्त्यासाठी आदित्य ठाकरे यांनी नरीमन पॉइंट, बधवार पार्क, मच्छीमार सोसायटी, कफ परेड, कुलाबा परिसरात प्रत्यक्ष पाहणी करून सूचना केल्या. यावेळी त्यांच्यासोबत एमएमआरडीएचे महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास उपस्थित होते.






























































