अन् चाडय़ावर मूठ धरली! आदित्य ठाकरे यांच्या हाती कुळव देताना बळीराजाचा चेहरा आनंदाने फुलला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, लातूर

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रा आज लातूर जिल्हय़ात पोहचली. चाकूर तालुक्यातील आष्टामोड येथील कार्यक्रमानंतर नळेगावकडे जात असताना अचानक आदित्य ठाकरे यांनी वाहनांचा ताफा थांबवला आणि त्यांनी थेट शेतात जाऊन चाडय़ावर मूठ आवळत पेरणी केली. आदित्य ठाकरे यांच्या हाती कुळव देताना शेतकऱ्याचा चेहरा आनंदाने फुलला.

नळेगाव रस्त्याशेजारी नागनाथ तोडकरी हे पेरणीच्या कामात व्यस्त होते. आदित्य ठाकरे यांनी ते पाहिले आणि थेट शेतात धाव घेतली. या भागात पाऊस उशिरा झाल्यामुळे पेरण्यांची लगबगही उशिराच सुरू झाली आहे. चाडय़ावर मूठ आवळत पेरणी करताना, सर्जा-राजाचा कासरा आवळताना आदित्य ठाकरे यांनी तोडकरी यांच्याशी संवाद साधला. मुक्या जनावरांच्या चारापाण्याविषयीच्या समस्या, शेतीचे प्रश्न, शेतकऱ्यांच्या अडीअडचणी यांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली.नळेगाव, डिघोळ शिवारातही जाऊन त्यांनी शेतकऱ्यांशी हितगुज केलेच, पण सुनील बिरासदार या शेतकऱ्याच्या शेतात कोळपणीच्या कामातही मदत केली.

भगवा महाराष्ट्र घडवण्यासाठी एकत्र या! औसा येथे ‘जनआशीर्वाद’ यात्रेचे भव्य स्वागत

महाराष्ट्र हा तुम्हा-आम्हा सर्वांचा आहे. तमाम शिवसैनिकांनी ठरवले तर हा महाराष्ट्र भगवा होण्यास वेळ लागणार नाही. भगवा महाराष्ट्र घडवण्यासाठी एकत्र या, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले. आदित्य ठाकरे यांच्या ‘जनआशीर्वाद’ यात्रेचे आज लातूर जिल्हय़ात आगमन झाले. औसा येथे टी पॉइंटवर यात्रेचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांनी ही यात्रा मते मागण्यासाठी नसल्याचे स्पष्ट केले. जनताजनार्दन माझा देव आहे आणि त्याचे आशीर्वाद घेण्यासाठी मी आलो असल्याचे ते म्हणाले.

शिवसैनिकाच्या हाती असलेला भगवा हा फक्त झेंडा नाही, तर ती जबाबदारी आहे. प्रत्येक शिवसैनिकाने ठरवले तर संपूर्ण महाराष्ट्र भगवा होण्यास वेळ लागणार नाही. यातूनच आपल्याला उद्याचा महाराष्ट्र घडवायचा आहे. त्यामुळे अगोदर सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे. नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी तुम्ही-आम्ही सारे मिळून काम करूया असे आवाहन यावेळी आदित्य ठाकरे यांनी केले.

आपली युती भगव्याबरोबर

भाषणात आदित्य ठाकरे यांनी शेतकरी संपूर्ण कर्जमुक्त झाल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही असा इशारा दिला. आपली युती ही भगव्याबरोबर आहे, शेतकऱ्यांबरोबर आहे. शेतकऱ्यांना कोणतीही अडचण असेल तर त्यांनी बिनदिक्कत शिवसैनिकास सांगावी. कर्जमाफी असो, पीकविमा असो, शिवसैनिक आपल्या मदतीसाठी तत्पर असेल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. गेल्या आठवडय़ात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विमा कंपन्यांच्या पाठीत आसुड हाणला. त्यामुळेच विमा कंपन्या सध्या गावोगाव फिरताना दिसत आहेत, असेही ते म्हणाले.

राममंदिराचे निर्माण झालेच पाहिजे!

अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्राचे भव्यदिव्य मंदिर असावे हे या देशातील प्रत्येक हिंदूचे स्वप्न आहे. अयोध्येत राममंदिराचे निर्माण झाल्याशिवाय शिवसेनेला चैन पडणार नाही. त्यासाठी आतापासूनच कामाला लागा. तुमच्या हातातील भगवा गावागावात घेऊन जा. भगव्याची आन-बान-शान राखायची असेल  तर एकत्र या असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी यावेळी   केले. यावेळी राज्याचे जलसंधारण मंत्री तथा धाराशीव जिह्याचे पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत, खासदार ओमप्रकाश राजे-निंबाळकर, माजी आमदार दिनकर माने, संतोष सोमवंशी, सतीश शिंदे, सुरेश भुरे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.