
विकासाच्या नावाखाली भाजपधार्जिण्या सरकारकडून पर्यावरणाचा ऱ्हास केला जात असून वर्सोवा-भाईंदर कोस्टल रोडसाठी 45 हजार तिवरांची कत्तल केली जाणार आहे. पर्यावरणवाद्यांचा विरोध असतानाही हा प्रकल्प रेटला जात आहे. यावरून शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल चढवला. भाजप सरकारने काय दिले तर सरकारने आपल्याला विनाश दिल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
मुंबई शहर आणि उपनगरांना समुद्राच्या अजस्त्र लाटांपासून वाचवणाऱया कांदळवनांवर पुऱहाड चालवण्यास पर्यावरणप्रेमींनी विरोध केला आहे. असे असताना वर्सोवा-भाईंदर कोस्टल रोडसाठी 45 हजार तिवरांची कत्तल करण्यात येणार आहे. यावरून आदित्य ठाकरे यांनी माध्यमात आलेल्या वृत्तांची कात्रणे ‘एक्स’वर शेअर करत भाजप सरकावर हल्ला चढवला.
‘भाजप सरकारने आपल्या शहराला काय दिले… विनाश. स्वच्छ हवेसाठी 2047 पर्यंत वाट पाहा,’ असे ‘एक्स’वर नमूद करत मुंबई क्लायमेटच्या एका दिवसानंतरच भाजप सरकार पुन्हा आपल्या मूळ रूपावर आले आहे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
बिल्डर मोकाट, खाणकामास सूट
45 हजार कांदळवने (मँग्रोव्हज) कापली जाणार आहेत. हवेची गुणवत्ता (एक्यूआय) अत्यंत खालावलेली आहे. बिल्डर मोकाट सुटले असून झाडांची कत्तल करत आहेत. आमचे 226 एकरचे खुले उद्यान आता कार पार्ंकगमध्ये बदलले जात आहे. व्याघ्र प्रकल्पांमध्ये खाणकामास परवानगी देण्यात आली आहे. वन्यजीव अभयारण्यातील पाच लाख झाडे कापली जाणार. यासाठी परवानग्याही दिल्या गेल्या आहेत, असे आदित्य ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.





























































