शिवरायांच्या आशीर्वादाने दिल्लीच्या तख्तावर भगवा फडकवू! आदित्य ठाकरे यांचा विश्वास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, पुणे

लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ उद्यापासून होत आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी आपण शिवजन्मस्थळी आलो आहोत. या आशीर्वादातून दिल्लीच्या तख्तावर नक्कीच भगवा फडकवू, असा ठाम विश्वास शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी येथे व्यक्त केला.

किल्ले शिवनेरी येथील शिवजन्मस्थळी शिवजन्मोत्सवाचा सोहळा शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत अत्यंत जल्लोषात साजरा करण्यात आला. शिवजन्मस्थळी राजमाता जिजाऊ आणि बालशिवबा यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदित्य ठाकरे यांनी वंदन केले. शिवसेना सचिव, खासदार अनिल देसाई, खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील, आमदार शरद सोनवणे आणि शिवसेना-भाजपचे पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.

आदित्य ठाकरे म्हणाले की, गडकिल्ल्यांचे संवर्धन, डागडुजी, सुशोभीकरण करण्यासाठी येत्या दोन वर्षांत आमचे सरकार जगापुढे आदर्श निर्माण होईल असे काम करून दाखवील. छत्रपती शिवाजी महाराजांनी 400 वर्षांपूर्वी घेतलेला भगवा ध्वज आणि शिवसेनाप्रमुखांनी घेतलेला भगवा ध्वज दिल्लीच्या तख्तावर आम्ही महाराजांच्या व जनतेच्या आशीर्वादाने नक्की फडकवू.