शेतकऱ्यांची संपूर्ण कर्ज मुक्ती हेच शिवसेनेचे ध्येय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मारतळा

लोहा-कंधार मतदारसंघातील मारतळा येथे मराठवाड्याच्या दुष्काळी दौऱ्यावर आलेले युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी शेतकरी व विद्यार्थ्यांशी संवाद साधला व शेतकऱ्यांनी दुष्काळी परिस्थितीचा खंभीरपणे मुकाबला करावा. शिवसेना नेहमी तुमच्या पाठिशी मदतीसाठी तयार आहे. तुम्ही अशा परिस्थितीत दुष्काळाला कंटाळून स्वतःचे बरेवाईट करून घेण्याचा विचार आपल्या डोक्यात आणू नका. शिवसेना सदैव तुमच्या पाठीशी आहे, घाबरू नका शेतकऱ्यांची संपूर्ण कर्ज मुक्ती हे शिवसेनेचे ध्येय आहे. आणि संपूर्ण कर्जमुक्ती उद्धव ठाकरेच देतील, असे ते म्हणाले. या प्रसगी त्यांनी त्यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी मारतळा येथे पशुखाद्य वाटप केले.

दि.१५ जानेवारीपासून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे नांदेड व हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी व शेतकऱ्यांच्या जनावरांना पशुखाद्य वाटप करण्यासाठी ग्रामीण भागात दौरा करत आहेत. या दौऱ्यात त्यांनी आज मारतळा येथे या भागातील शेतकऱ्यांशी संवाद साधला व त्यांच्या दुष्काळीबद्दल, कर्जमाफीबद्दलच्या प्रतिक्रिया जाणून घेत त्यांच्याशी हितगुज साधले. येथील दादाराव पा. वडवळे व भिमराव पांडुर्णे या शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या विविध समस्या व दुष्काळी परिस्थितीबद्दल आदित्य ठाकरे यांना जाणीव करून दिली. या प्रसंगी लोहा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या वतीने उपस्थित शेतकरी व मुक्तेश्वर धोंडगे यांच्या हस्ते काठी व घोंगडे देऊन व भाजीपाल्यांचा हार घालून आदित्य ठाकरे यांचे स्वागत करण्यात आले.

याप्रसंगी शिवसेना संपर्कप्रमुख आनंदराव जाधव, आ. हेमंत पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद बोंढारकर, दत्ता कोकाटे, उमेश मुंढे, जिल्हा समन्वयक धोंडू पाटील, मुक्तेश्वर धोंडगे, उपजिल्हाप्रमुख संजय पा.ढेपे, तालुकाप्रमुख संजय पाटील ढाले, भास्कर पाटील ढगे, स्वप्निल गारोळ, खंडू आकोले, सर्कलप्रमुख नागोराव सिरसाठ, शंकर सिरसाठ, संतोष वडवळे, विश्वांभर हंबर्डे, चक्रधर हांबर्डे, संभाजी वरडोळे, हाणमंत शिंदेसह शेकडो शिवसैनिक व शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.