ध्वज विजयाचा उंच धरा रे !

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अवघ्या महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे लक्ष लागलेल्या वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दणदणीत विजय मिळवला. एकूण मतांपैकी 70 टक्के मते त्यांनी मिळवली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरेश माने यांचा त्यांनी 67,427 मताधिक्याने पराभव केला. आदित्य ठाकरे यांच्यावर समाजाच्या विविध क्षेत्रांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

वरळी येथील मतमोजणी केंद्रावर सकाळपासूनच हजारो शिवसैनिक आणि युवासैनिकांनी गर्दी केली होती. त्याचप्रमाणे वरळीतील नागरिकांचीही त्यात मोठी संख्या होती. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच आदित्य ठाकरे हे आघाडीवर होते. शेवटच्या फेरीअखेर आदित्य ठाकरे यांना एकूण 89,248 मते मिळाली. वरळी मतदारसंघात झालेल्या एकूण मतदानापैकी ही मते 69.14 टक्के इतकी होती. दुसऱ्या क्रमांकावरील सुरेश माने यांना फक्त 21,821 मते मिळाली.

आदित्य ठाकरे यांच्या विजयाची घोषणा झाल्यानंतर मतमोजणी केंद्राबाहेर प्रचंड जल्लोष झाला. विजयी झाल्याचे प्रमाणपत्र स्वीकारल्यानंतर आदित्य ठाकरे मतमोजणी केंद्राबाहेर आले तेव्हा उपस्थित जमावाने त्यांना खांद्यावर उचलून जोरदार घोषणा दिल्या. ‘वरळीतील मतदारांनी मला आशीर्वाद दिला आणि मोठय़ा मताधिक्क्याने मला निवडून दिले त्याबद्दल मी अत्यंत आनंदी आहे.’ अशी प्रतिक्रिया यावेळी आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कुटुंबातील पहिलाच सदस्य आदित्य ठाकरे यांच्या रूपाने निवडणूक रिंगणात उतरला होता. त्यामुळे राजकीय पक्षांमध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात उत्सुकता होती. उमेदवारी अर्ज भरायला जाताना आदित्य ठाकरे यांच्या मिरवणुकीत हजारोंची गर्दी होती. त्यानंतर त्यांच्या प्रचारफेऱयांनाही वरळीकरांचा जोरदार प्रतिसाद लाभत होता. त्याच वेळी खऱया अर्थाने त्यांचा विजय निश्चित झाला होता.

शिवसेनाप्रमुखांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक
शिवसेना भवन येथे जाऊन त्यांनी तेथील भवानीमातेचे दर्शन घेतले. शिवसेनाप्रमुखांच्या प्रतिमेसमोर ते नतमस्तक झाले आणि नंतर आपले पिता व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचेही आशीर्वाद घेतले.