अग्नितांडवानंतर प्रशासनाला जाग; मीरा रोडमधील ४६ बेकायदा शेड, फर्निचर दुकानांवर महापालिकेने फिरवला बुलडोझर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मीरा रोड येथील प्लेझंट पार्क परिसरात मंगळवारी भीषण आग लागली होती. या अग्नितांडवानंतर खडबडून जाग आलेल्या महापालिका प्रशासनाने ४६ बेकायदा शेड आणि फर्निचरच्या दुकानांवर बडगा उगारत बुलडोझर फिरवला. पालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी दिलेल्या आदेशानुसार प्रभाग अधिकारी प्रियांका भोसले यांनी दोन दिवस विशेष मोहीम राबवत ही सर्व दुकाने जमीनदोस्त केली. त्यामुळे अतिक्रमण करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
काशिमीरामधील कृष्णस्थळ परिसरात असलेल्या बेकायदा मंडप डेकोरेटर्स आणि फर्निचरच्या गोदामाला मंगळवारी रात्री अचानक आग लागली. ही आग इतकी भीषण होती की आसपासच्या इमारतींमधील २५ हून अधिक घरांचे प्रचंड नुकसान झाले. या घटनेनंतर पालिका अॅक्शन मोडवर आली. पालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा आणि महापौर डिंपल मेहता
यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली असता प्रभाग क्रमांक ६ मध्ये ४६ बेकायदा शेड आणि फर्निचर दुकाने असल्याचे समोर आले. याबाबत कडक कारवाईचे आदेश मिळताच संबंधित अधिकाऱ्यांनी ती शेड आणि दुकाने जेसीबीच्या मदतीने भुईसपाट केली.