सोलापूर बाजार समितीवर प्रशासक नियुक्तीच्या हालचाली; 32 मुद्दय़ांच्या चौकशीसाठी पथकाची नियुक्ती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोलापूर बाजार समितीमध्ये गैरकारभार झाल्याची तक्रार सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे करण्यात आली होती. या तक्रारीवर प्रशासक नियुक्तीची कार्यवाही करण्याची सूचना सहकारमंत्र्यांनी जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांना केली. बाजार समितीच्या चौकशीसाठी तीन अधिकाऱ्यांचे पथक नियुक्त केले आहे. त्यांच्या मदतीसाठी पाच कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बाजार समितीच्या कारभारावर उपस्थित केलेल्या 32 मुद्दय़ांवरील चौकशीचा अहवाल आता जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांना सादर केला जाणार आहे.

काही भाडेपट्टाधारक, अडते, व्यापाऱ्यांनी बाजार समितीच्या मालमत्तापत्रकात पट्टेदार म्हणून नोंदणी करताना मंजुरी घेतली नाही. काही प्लॉटधारकांनी त्यांच्या भागीपत्रकातील भागधारकांच्या बदलांची नोंदी बाजार समितीच्या मंजुरीशिवाय मालमत्तापत्रकात करून घेतल्या आहेत. समितीकडून लीजवर घेतलेल्या जागांवर काही प्लॉटधारकांनी वित्तीय संस्थांकडून कर्ज घेतले असून, कर्ज घेताना संबंधितांनी व वित्तीय संस्थांनी बाजार समितीची मंजुरी घेतली नाही, तसेच बाजार समितीच्या मालमत्तापत्रकात बोजाची नोंद केली आहे.

काही प्लॉटधारकांनी बाजार समितीच्या जागा खरेदी केल्याचे मालमत्तापत्रकात दिसून येते. काही भाडेपट्टा प्लॉटवर बँकांनी जप्तीचा आदेश बजावला आहे व मालमत्तापत्रकात त्याची नोंदही करून घेतली आहे. प्लॉटधारकांनी बाजार समितीच्या उपरोक्ष मालमत्तापत्रकात वारस नोंद, हक्कसोड, नावात बदल करून घेतले आहेत. यांसह 32 मुद्दय़ांची तक्रार सूर्यकांत व्हनमाने व बसवराज माळगे यांनी सहकारमंत्र्यांकडे केली आहे.

हे आठ अधिकारी, कर्मचारी करणार चौकशी
सहकारमंत्री पाटील यांनी दिलेल्या सूचनेनुसार जिल्हा उपनिबंधक भोळे यांनी तीन अधिकाऱ्यांचे पथक नियुक्त केले आहे. त्यामध्ये सहकार विभागाचे जिल्हा विशेष लेखापरीक्षक विष्णू डोके हे पथक प्रमुख आहेत. त्यांच्या मदतीला सहायक विशेष लेखापरीक्षक बी. सी. पवार व सहायक विशेष लेखापरीक्षक आर. एस. नागुरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या तीन अधिकाऱ्यांनी त्यांच्या मदतीसाठी विशेष लेखापरीक्षक कार्यालयातील पाच कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. बाजार समितीच्या कारभारावर झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने हे आठ अधिकारी व कर्मचारी चौकशी करून अहवाल देणार आहेत.

सोलापूर बाजार समितीच्या चौकशीसाठी माझ्यासह तिघांच्या नियुक्तीचा आदेश मिळाला आहे. आम्ही मदतीसाठी आमच्या कार्यालयातील पाच कर्मचाऱयांची नियुक्ती केली आहे. बाजार समितीत जाऊन आम्ही तत्काळ दप्तर देण्याची मागणी केली आहे. दप्तर उपलब्ध झाल्यानंतर तक्रारीच्या मुद्दय़ांवर चौकशी करण्यात येईल आणि याबाबतचा अहवाल जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांना सादर केला जाईल.
-विष्णू डोके, तपासणी पथकप्रमुख.