
बार्टी, सारथी, महाज्योती, आर्टी या संस्थांमध्ये यापुढे विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारावर विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश देण्यात येणार असून या संस्थांमधील विद्यार्थ्यांची संख्या, सर्वसाधारण शिष्यवृत्ती, परदेशी शिष्यवृत्ती, प्रवेश प्रक्रियेबाबत समान धोरण राबवण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान परिषदेत दिली.
विधान परिषद सदस्य संजय खोडके, अभिजीत वंजारी यांनी विचारलेल्या प्रश्नावर अजित पवार यांनी उत्तर दिले. सारथी संस्थेमध्ये 2018 ते 25 या कालावधीत 83 अभ्यासक्रमांमध्ये 3 लाख विद्यार्थ्यांना सरकारमार्फत विद्यावेतन, शिष्यवृत्ती आदी लाभ देण्यात आले. त्यापैकी 3 हजार म्हणजे केवळ 1 टक्का विद्यार्थ्यांनी पीएच.डी. अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतला होता, असे त्यांनी सांगितले.
रोजगार मिळेल अशा अभ्यासक्रमांना प्रवेश
बार्टी, सारथी, महाज्योती, आर्टी या संस्थांमध्ये यापुढे ज्या अभ्यासक्रमांच्या आधारे रोजगार मिळेल, अशाच अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल, विद्यार्थी संख्या, प्रवेश प्रक्रिया, शिष्यवृत्ती यांची संख्या ठरविणे आणि गुणवत्ता वाढ यासंदर्भात मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीचा अहवाल प्राप्त झाल्याचे अजित पवार म्हणाले.