
मेट्रो स्थानकांच्या नावांमध्ये आता जाहिरातदारांची ‘घुसवाघुसव’ केली जात आहे. या माध्यमातून संबंधित विभागांची स्थानिक ओळख पुसण्याचे एमएमआरडीएचे कारस्थान उघड होत आहे. गुरुवारी बोरिवली पश्चिमेकडील शिंपोली स्टेशनच्या नावात ‘आदित्य कॉलेज शिंपोली’ असा बदल करण्यात आला. त्यावर तीव्र आक्षेप नोंदवत शिवसेनेने एमएमआरडीएच्या अधिकाऱयांना जाब विचारला.
पश्चिम उपनगरात मेट्रो-2ए मार्गिका अलीकडेच प्रवासी सेवेत खुली केली आहे. बोरिवली पश्चिमेकडे शिंपोली गाव ब्रिटिशपूर्व काळापासून अस्तित्वात आहे. पूर्वी याठिकाणी स्थानिक आगरी कोळी समाजाच्या शेतजमिनी होत्या. स्थानिकांच्या मागणीनंतर मेट्रो स्थानकाचे नाव शिंपोली ठेवले. मात्र जाहिरातदारांनी कोटय़वधी रुपये देण्याची तयारी दाखवताच एमएमआरडीएने शिंपोली स्थानकाचे ‘आदित्य कॉलेज शिंपोली स्टेशन’ असे नामकरण केले. त्यामुळे शिवसैनिकांनी मेट्रो स्थानकात जमून एमएमआरडीएच्या अधिकाऱयांना जाब विचारला. शिंपोली हे नाव शासनाच्या राजपत्रात नमूद असताना मेट्रो प्रशासनाने ‘आदित्य कॉलेज शिंपोली’ हे नामांतरण कोणत्या नियमानुसार केले, असा सवाल शिवसैनिकांनी उपस्थित केला.
शिवसैनिकांनी दिला 15 दिवसांचा अल्टिमेटम
मेट्रो स्थानकाचे नाव रातोरात बदलले. एमएमआरडीएच्या या कारभाराला शिवसैनिकांनी तीव्र विरोध केला. यावेळी शाखाप्रमुख सागर सरफरे, उपविभागप्रमुख मनोहर खानविलकर, महिला बोरिवली विधानसभाप्रमुख शरयू भोसले, उपशाखाप्रमुख चंद्रकांत मिसळ आणि मनीष मोदी यांच्यासह श्री शिंपोली ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष पंढरीनाथ भंडारी, सुरेश लाड आदी उपस्थित होते. एमएमआरडीएने 15 दिवसांत शिंपोली स्थानकाचे नाव पूर्ववत करावे, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा शिवसेनेने दिला आहे.