
शाळेत यायला दहा मिनिटे उशीर झाला म्हणून पाठीवर दप्तर ठेवून शंभर उठाबश्या काढायला लावल्याने वसईत सहावीत शिकणाऱया मुलीचा नाहक मृत्यू झाला. या प्रकरणाची दखल घेऊन चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करावी अशी मागणी करत एका वकिलाने हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांना पत्र लिहिले आहे.
सहावीत शिकणारी काजल गौड हिच्यासह काही विद्यार्थी 8 नोव्हेंबर रोजी शाळेत उशिरा पोहोचले. याची शिक्षा म्हणून पाठीवर दप्तर ठेवून शंभर उठाबश्या काढण्यास तिला सांगण्यात आले. शाळेतून घरी आल्यानंतर काजल हिला पाठदुखीचा त्रास होऊ लागला. जे.जे. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच 14 नोव्हेंबर रोजी तिचा मृत्यू झाला. आरोपीवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही तसेच शाळेकडूनही बचावात्मक पवित्रा घेतला जात असल्याने या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी तसेच या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करत वकील स्वप्ना कोदे यांनी हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांना पत्र लिहिले आहे. राज्य सरकार तसेच पोलीस महासंचालकांना या प्रकरणात नोटीस बजावण्यात यावी, त्याचबरोबर शाळा व्यवस्थापन व दोषी शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे. काजलच्या मृत्यूची व शाळेच्या कारभाराची जलदगतीने चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याची आवश्यकता असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.


























































