देश विदेश – अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री हिंदुस्थानच्या दौऱ्यावर

अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री मावलवी आमीर खान मुत्ताकी हे हिंदुस्थानच्या दौऱ्यावर आले आहेत. गुरुवारी ते दिल्लीत पोहोचले असून त्यांचा हा दौरा एकूण सहा दिवसांचा राहणार आहे. हिंदुस्थानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवत्ते रणधीर जायसवाल यांनी एक्सवर पोस्ट करून त्यांचे स्वागत केले. मुत्ताकी हे मागील महिन्यात हिंदुस्थान दौऱ्यावर येणार होते, परंतु संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दौऱ्यामुळे त्यांना हा दौरा पुढे ढकलावा लागला.

केटी रामाराव यांना नजरकैदेत ठेवल्याचा आरोप

तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांच्या भारतीय राष्ट्र समिती (बीआरएस) ने दावा केला आहे की, पार्टीचे कार्यकारी अध्यक्ष केटी रामाराव यांना पोलिसांनी त्यांच्या घरी नजरकैदेत ठेवले आहे. त्यांच्या घराबाहेर मोठा पोलीस फौजफाटा तैनात ठेवण्यात आल्याने त्यांना घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे, असा आरोप बीआरएसने केला आहे.

47 हिंदुस्थानी मच्छीमारांना श्रीलंकेत अटक

श्रीलंकेच्या नौदलाने गुरुवारी 47 हिंदुस्थानी मच्छीमारांना अटक केली. त्यांच्या पाच ट्रॉलर बोटसुद्धा जप्त करण्यात आल्या. श्रीलंकन नौदलाने ही कारवाई उत्तरी श्रीलंकेच्या तलाईमन्नार क्षेत्रात केली. श्रीलंकेच्या समुद्री भागात मासेमारी केल्याचा या मच्छीमारांवर आरोप आहे. गेल्या महिन्यात 12 हिंदुस्थानी मच्छीमारांना जाफनाजवळ अटक करण्यात आली होती.

ह्युस्टनमध्ये गोळीबार, चार जणांचा मृत्यू

अमेरिकेच्या टेक्सास राज्याच्या ह्युस्टनमध्ये वेगवेगळ्या दोन घटनेत झालेल्या गोळीबारात चार लोकांचा मृत्यू झाला आहे. यात हल्लेखोरांचाही समावेश आहे. पहिली घटना दुपारी 1 वाजता शुगर लँड उपनगरात घडली. या ठिकाणी एका व्यक्तीने कारमधून दुसऱ्या कारवर गोळीबार केला. यात एक जण गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल केले, परंतु तेथे त्याचा मृत्यू झाला. दुसरी घटना ह्युस्टन शहरात मॅकेनिक वर्कशॉपमध्ये घडली. एका मॅकेनिकने एका घटनेतील साक्षीदाराला गोळी घातली.

तेल खरेदीचे युआनमध्ये पेमेंट करण्याची मागणी

हिंदुस्थानच्या सरकारी तेल कंपन्यांनी रशियाकडून तेल खरेदी केल्यानंतर त्याचे पेमेंट चिनी चलन युआनमध्ये द्यावे, अशी मागणी केली आहे. हिंदुस्थानी तेल कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने नुकतेच रशिय तेल कार्गो म्हणजेच दोन ते तीन खेप रशियन तेलाची किंमत चिनी युआनमध्ये पे केली होती.