
दुचाकींना टोल लागणार असल्याचे वृत्त गेल्या महिन्यात आले. परंतु, देशभरातून याला होत असलेला विरोध पाहता मोदी सरकारने घुमजाव केले आणि दुचाकींकडून टोल वसूल करणार नसल्याचे खुद्द केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले. याला महिनाही पूर्ण झाला नसताना मोदी सरकारचा दुचाकाRकडून टोल वसुलीचा प्लानच समोर आला आहे. गोरखपूर लिंक एक्स्प्रेस-वेवर दुचाकीचालकांकडून टोल वसुली लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहितीच तेथील व्यवस्थापकांनी सरकारी आदेशाच्या हवाल्याने दिली. हा व्हिडिओ पोस्ट करत काँग्रेसने मोदी सरकारच्या छुप्या अजेंडय़ाची आज पोलखोल केली.
सरकारची लपवाछपवी
- मोदी सरकार दुचाकीवर टोल लावणार अशा बातम्या 26 जून रोजी झळकल्या.
- या बातमीचे तीव्र पडसाद उमटले. लोकांनी अशा टोलला कडाडून विरोध केला.
- मोदी सरकारने लगेच यू टर्न घेतला आणि दुचाकीवर टोल हे वृत्त खोटे असल्याचे सांगितले.
- सरकारच्या स्पष्टीकरणाने लोकांचा विरोध मावळला. मात्र आता महिनाभरानंतर उत्तर प्रदेशातील टोलनाक्यावरील व्यवस्थापकानेच भाजप सरकारचा छुपा अजेंडा समोर आणला.
जनतेकडून वसुली करून श्रीमंत मित्रांचे खिसे भरणे हाच भाजपाचा फंडा
गरीब जनतेकडून टोल तसेच इतर योजनांच्या माध्यमांतून वसुली करायची आणि आपल्या श्रीमंत मित्रांचे खिसे भरायचे हाच भाजपाचा फंडा आहे, अशी टीका काँग्रेसने केली. दुचाकीवाल्यांनो सतर्क राहा, पुढे टोल नाका आहे, अशा शब्दांत भविष्यातील लुटीची कल्पनाही काँग्रेसने दिली आहे. यावर हा प्रकल्प आमच्या अखत्यारित येत नाही, असे अजब स्पष्टीकरण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिले.
140 रुपये टोल
व्यवस्थापकाने दुचाकीकडून वसूल केल्या जाणाऱया टोलची रक्कमसुद्धा जाहीर केली. दुचाकीस्वाराला 140 रुपयांचा टोल द्यावा लागेल. एक्सप्रेस वेचे अंतर जास्त असेल तर रक्कम वाढेल, असे सांगितले.