India Pakistan Ceasefire : पहलगामच्या पीडितांना न्याय मिळाला की नाही? युद्धविरामानंतर काँग्रेसचा सवाल

हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झाली आहे. यातच युद्धविरामानंतर पहलगामच्या पीडितांना न्याय मिळाला की नाही, असा प्रश्न काँग्रेसने उपिस्थत केला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पवन खेरा यांनी ‘एएनआय’शी संवाद साधताना हा प्रश्न उपस्थित केला आहे.

‘एएनआय’शी संवाद साधताना पवन खेरा म्हणाले की, “अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडून आम्हाला कळलं की, हे घडलं आहे. हे खूप अनपेक्षित आहे. हिंदुस्थान जे प्रश्न विचारू इच्छितो ते फक्त संसदेच्या विशेष अधिवेशनातच विचारता येतील. काँग्रेस विशेष अधिवेशनाची मागणी करते, गेल्या 5 ते 7 दिवसांत हिंदुस्थानने काय मिळवले आणि काय गमावले, हे जाणून घेण्याचा देशाला अधिकार आहे. पहलगामच्या पीडितांना न्याय मिळाला की, नाही हे जाणून घेण्याचा अधिकार आहे.”

दरम्यान, अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर हिंदुस्थान आणि पाकिस्तानने युद्धबंदीवर सहमती दर्शविली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याबद्दल ‘ट्रुथ सोशल’ एक पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. आपल्या पोस्टमध्ये डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत की, “अमेरिकेच्या मध्यस्थीने झालेल्या दीर्घ चर्चेनंतर, मी आनंदाने जाहीर करतो की हिंदुस्थान आणि पाकिस्तानने तात्काळ आणि पूर्ण युद्धबंदीवर सहमती दर्शवली आहे. दोन्ही देशांचा सामंजस्यपणा आणि प्रसंगावधानासाठी अभिनंदन.”