
कल्याणनंतर आता डोंबिवलीतही कोरोनामुळे एका 57 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू असताना रुग्णाचा मृत्यू झाला. केडीएमसी आरोग्य विभागाच्या प्रमुख अधिकारी डॉ. दीपा शुक्ल यांनी ही माहिती दिली. दोनच दिवसांपूर्वी कल्याण पूर्वेतील 47 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. पालिका क्षेत्रात कोरोनाचे दोन बळी गेल्यानंतर पालिका प्रशासन सतर्क झाले आहे.
सध्या केडीएमसी क्षेत्रात केवळ एक कोरोना रुग्ण असून तो होम आयसोलेशनमध्ये आहे. कोरोनाच्या वाढत्या घटनांमुळे केडीएमसी प्रशासन सजग झाले असून नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन पालिकेने केले आहे. पालिका क्षेत्रातील रुग्नालयामध्ये स्वतंत्रनंतर कोरोना विलगीकरण कक्ष तयार केले जात आहेत. शिवाय मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासंबंधी पालिकेचे पथक जनजागृती करत आहे.
भिवंडी पालिका रुग्णालय सज्ज
भिवंडी – कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर भिवंडीतील इंदिरा गांधी स्मृती शासकीय उपजिल्हा रुग्णालयात 15 बेडचे सुसज्ज कक्ष तयार ठेवले आहे. ही माहिती अधिक्षिका डॉ. माधवी पंदारे यांनी दिली. तर भिवंडी पालिका आरोग्य विभागानेसुद्धा मंडई येथील बीजीपी रुग्णालयात 30 बेडचे स्वतंत्र विलगीकरण कक्ष तयार केल्याची माहिती पालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप गाडेकर यांनी दिली.
विशेष पुनरुज्जीवन योजनेची मागणी
ठाणे – 20219 ते 2022 या कोविड कालखंडात आर्थिक अडचणीत सापडलेल्या मराठी चित्रपट निर्मात्यांसाठी विशेष सहाय्य व पुनरुज्जीवन योजना राबवावी, अशी मागणी अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाने केली आहे. महामंडळाचे अध्यक्ष देवेंद्र मोरे आणि ठाणे संचालक डॉ. सुहास राणे यांनी याबाबतचे निवेदन सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.