ओबीसींसाठी आक्रमक वडेट्टीवारांना आयकर नोटीस

ओबीसी आरक्षणासाठी जनआंदोलन छेडणारे काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यामागे आयकर विभागाचा ससेमिरा लागला आहे. वडेट्टीवार यांना आयकर विभागाकडून नोटीस बजावण्यात आली आहे.

विजय वडेट्टीवार यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्दय़ावरून नागपूरमध्ये महामोर्चा काढला होता. त्या मोर्चामध्ये हजारो ओबीसी बांधव सहभागी झाले होते. त्या मोर्चानंतर वडेट्टीवार यांना तत्काळ आयकर विभागाची नोटीस आली. गडचिरोली येथे काँग्रेसच्या एका कार्यक्रमात वडेट्टीवार यांनी स्वतः त्याबाबत माहिती दिली.

राजकीय सूडबुद्धीने कारवाई

ओबीसी आरक्षणासाठी मोठे जनआंदोलन उभारल्याने राजकीय सूडबुद्धीने ही नोटीस बजावण्यात आली आहे. ओबीसींच्या हक्कांसाठी उभे राहिल्यामुळे केंद्र सरकार यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे, पण आम्ही गप्प बसणार नाही, अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली.