
राम कपूर टीव्हीच्या टॉप स्टार्सपैकी एक आहे. बॉलिवूडपासून ओटीटीपर्यंत देखील आपली ओळख निर्माण केली आहे. परंतु या टप्प्यावर पोहोचण्यासाठी, अभिनेत्याला अनेक चढ-उतारांना तोंड द्यावे लागले आहे. त्याच्या अभिनय कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्याला आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागले होते. त्यावेळी त्याची रोजची कमाई 1000 रुपये इतकी होती. परंतु कठीण काळात पत्नी गौतमी कपूरने मात्र त्याला मोलाची साथ दिली होती. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत राम कपूरने, त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला झालेल्या संघर्षाबद्दल उघडपणे सांगितले आहे.
अलीकडेच मनी कंट्रोलला दिलेल्या मुलाखतीत, रामने खुलासा केला की लग्नानंतर त्याच्याकडे कोणतेही काम नव्हते, म्हणून तो त्याच्या पत्नीकडून पैसे घेत असे. तो म्हणाला, “जेव्हा मी गौतमीशी लग्न केले तेव्हा पहिल्या वर्षी मी तिच्या कमाईवर जगत होतो. ती काम करत होती, त्यावेळी माझ्याकडे काहीच काम नव्हते. मी उठायचो, तिच्यासाठी कॉफी बनवायचो आणि ती कामावर जायची. मी मात्र तब्बल वर्षभर घरीच होतो.”
रामने 1998 मध्ये दूरदर्शनवरील मालिका “न्याय” आणि सोनी टेलिव्हिजनवरील मालिका “हीना” या मालिकेने त्याच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. 2000 मध्ये तो स्टार प्लसवरील मालिका “घर एक मंदिर” च्या सेटवर गौतमीला भेटला. या शोने त्याला ओळख मिळवून दिली असली तरी त्याला अनेक आर्थिक आव्हानांना तोंड द्यावे लागले. त्यानंतर “कसम से” (2006) मधील जय वालियाची भूमिका त्याच्या कारकिर्दीला एक वळण देणारी ठरली. त्यानंतर तो टेलिव्हिजनवरील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक बनला.
याबाबत राम म्हणाला, “मी दररोज 1500 रुपयांपासून सुरुवात केली. ते आव्हानात्मक होते. पण गौतमी माझ्या पाठीशी उभी राहिली. आणि आता आम्ही कुठे आहोत ते पहा.” तो पुढे म्हणाला, “जेव्हा “कसम से” सुरू झाला तेव्हा माझी मुलगी जन्माला आली आणि मी कधीही मागे वळून पाहिले नाही, ती येताच सर्व काही बदलले.”