नीट यूजीनंतर नीट पीजी परीक्षेवरही प्रश्नचिन्ह

नीट यूजी पेपरफुटीनंतर आता 11 ऑगस्ट रोजी होणाऱया नीट पीजी परीक्षेवरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. परीक्षेशी संबंधित गोपनीय पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आतापर्यंत 8 हजारांहून अधिक लोकांनी हे पत्र पाहिले आहे. नीट पीजी प्रकरणाशी संबंधित हे पत्र असून परीक्षेशी संबंधित माहितीचा उल्लेख या पत्रात आहे.

नीट पीजीशी संबंधित एक पत्र ऑल एफएमजी असोसिएशनने (एएफए) एक्सवरून शेअर केले आहे. यात परीक्षा शिफ्ट आणि परीक्षा देणाऱया विद्यार्थ्यांची संख्या याविषयी माहिती आहे. परीक्षेआधी अनधिकृतरीत्या परीक्षेसंबंधी महत्त्वाची माहिती सोशल मीडियावर लीक झाल्याने नीट पीजी परीक्षेच्या सुरक्षिततेविषयी उमेदवार खात्री बाळगू शकतील का, असा सवाल एक्सवरील या पोस्टमध्ये करण्यात आला आहे.

नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेस नीट पीजी परीक्षेचे आयोजन करते. या संस्थेचे हे गोपनीय पत्र असल्याचा दावा एएफएने आपल्या पोस्टमध्ये केला आहे. नीट पीजी परीक्षा 11 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते दुपारी 12.30 आणि दुपारी 3.30 ते सायंकाळी 7 अशा दोन शिफ्टमध्ये होणार आहे. तसेच ही परीक्षा सीबीटी मोडद्वारे घेण्यात येणार असून परीक्षा केंद्रांची माहिती देण्यात आली आहे. या पत्रावर 1 ऑगस्ट 2024 ही तारीख असून ही परीक्षा 169 शहरांतील 376 परीक्षा केंद्रांवर होणार असून 2 लाख 28 हजार 542 उमेदवारांसाठी या परीक्षेचे आयोजन करण्यात येणार असल्याचा उल्लेखही या पत्रात आहे.