
‘ऑपरेशन सिंदूर’ वेळी पाकिस्तानकडून केल्या जाणाऱया हल्ल्यात हिंदुस्थानची सुरक्षा करणारी सर्वात सुरक्षित संरक्षण सिस्टम एस-400 आणखी खरेदी करण्याची तयारी हिंदुस्थानकडून सुरू आहे. डिसेंबर महिन्यात रशियाचे राष्ट्रपती पुतीन हे हिंदुस्थान दौऱयावर येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर पुतीन हिंदुस्थान दौऱयावर आले तर हिंदुस्थान रशियाकडून एस-400 आणि एस-500 संरक्षण सिस्टम खरेदी करण्याची शक्यता आहे. पाच संरक्षण सिस्टम एस-400 साठी करार आधीच झाले आहेत. यातील हिंदुस्थानला आधीच तीन मिळाल्या आहेत. दोन लवकरच मिळणार आहेत. परंतु, हा करार या व्यतिरिक्त असणार आहे. एस-400 सोबत हिंदुस्थान एस-500 संरक्षण सिस्टमही खरेदी करणार आहे.
हिंदुस्थानची संरक्षण सिस्टम एस-400 ने ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानने केलेले ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले हवेतच पाडून हाणून पाडले होते. हिंदुस्थानने ऑक्टोबर 2018 मध्ये रशियासोबत एस-400 हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीच्या पाच युनिट्स खरेदी करण्यासाठी 5 अब्ज डॉलर्सचा करार केला होता. हिंदुस्थान आता एस-500 क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करण्याचा विचार करत आहे.
किती शक्तीशाली आहे एस-400
- 40-400 किमीची ऑपरेशन रेंज
- 4800 मीटर सेकंदचा वेग
- 30-60 किमी उंच
- 600 किमीपर्यंत हल्ल्याचे लक्ष्य
- 5 ते 10 मिनिटात डिप्लॉयमेंट टाइम
- ऑर्डर मिळाल्यानंतर 5 ते 10 मिनिटांत ते वापरासाठी तयार होते
- 400 किमी अंतरावरून लक्ष्य शोधू शकते
- एका एस-400 स्क्वॉड्रनमध्ये 256 क्षेपणास्त्रे असतात
काय आहे एस-400 संरक्षण प्रणाली?
एस-400 ट्रायम्फ ही रशियाची सर्वात प्रगत क्षेपणास्त्र प्रणाली आहे, जी 2007 मध्ये लाँच करण्यात आली. ही प्रणाली लढाऊ विमाने, बॅलिस्टिक आणि क्रूझ क्षेपणास्त्रे, ड्रोन आणि अगदी गुप्त विमानेदेखील पाडू शकते. विविध हवाई धोक्यांविरुद्ध ती एक शक्तिशाली ढाल म्हणून काम करते. ही जगातील सर्वात प्रगत हवाई संरक्षण प्रणालीपैकी एक मानली जाते.