
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी प्रकृती अस्वस्थाच्या कारणास्तव सोमवारी अचानक राजीनामा दिला होता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. यातच त्यांच्या या निर्णयाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. धनखड यांनी राजीनाम्यानंतर लगेचच उपराष्ट्रपती भवन रिकामे करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यांनी सामानाची बांधाबांध सुरू केली आहे, असं वृत्त ‘आज तक’ने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.
‘आज तक’च्या सूत्रांनुसार, त्यांनी मंगळवारीराष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला, जो त्याच दिवशी स्वीकारला गेला. यानंतर त्यांनी कोणत्याही राजकीय नेत्यांशी भेट टाळली. दरम्यान, जगदीप धनखड यांनी ऑगस्ट 2022 मध्ये उपराष्ट्रपती पदाची सूत्रे स्वीकारली होती आणि त्यांचा कार्यकाळ 2027 पर्यंत होता. मात्र त्यांनी आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगितले. त्यांच्या अचानक राजीनाम्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले असून, यामागे राजकीय कारणे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
धनखड हे गेल्या वर्षी एप्रिल 2024 मध्ये संसद भवन संकुलाजवळील नव्याने बांधलेल्या उपराष्ट्रपती भवनमध्ये राहायला गेले होते. आता ते लवकरच हे निवासस्थान रिकामे करणार आहेत. त्यांना लुटियन्स दिल्लीत टाइप VIII बंगला दिला जाऊ शकतो, असं बोललं जात आहे.