अनलॉकनंतर गोव्यात कोरोनाचा वेग वाढला, दिवसाला शंभरीकडे वाटचाल

713

गोव्यात कोरोना आता वेगाने फैलावू लागला आहे. गेले दोन दिवस अनुक्रमे 95 आणि 94 रुग्ण मिळाल्यानंतर लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आज त्यात भर पडली. आता पर्यंतचे सर्वाधिक म्हणजे तब्बल 108 रुग्ण आज एकाच दिवसात आढळले असून काल एकाच दिवसात दोघांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 6 वर पोचला असल्याने परिस्थिती चिंताजनक बनली आहे.

काल कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झाला. कुडतरी येथील 74 वर्षीय महिला कोविड हॉस्पिटल मध्ये उपचार घेत होती तिचा आणि खारेवाडा-वास्को येथील 45 वर्षीय इसमाचा काल कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 6 वर गेला आहे.

राज्यात आता पर्यंत 1684 रुग्ण सापडले आहेत.त्यातील 853 सक्रिय असून 825 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.आता पर्यंत कोरोनामुळे 6 जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पाचव्या रुग्णाच्या मृतदेहावर आज कूडतरी येथील सेंट आलेक्स चर्च परिसरात अंत्यसंस्कार करण्यात आले. आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी आज देखील उपस्थित राहून कुटुंबीयांना धीर दिला आहे.यापूर्वी देखील त्यांनी कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णाच्या अंत्यसंस्काराला हजेरी लावली होती.त्यांच्या या कृतीची दखल  समाजातील सर्व स्तरातून घेतली जात आहे.

मांगोर हिल मुळेच राज्यात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे.मांगोर हिल मध्ये सध्या 241 रुग्ण असून मांगोर हिलशी निगडीत रुग्णांची संख्या 270 वर पोचली आहे.मुख्यमंत्र्यांच्या साखळीत 44 रुग्ण सापडले असल्याने तेथील परिस्थिती चिंताजनक आहे.

सडा(67),बायणा(72),कुडतरी(31), न्यू वाडे (57), चिंबल(28), झुवारीनगर(97), मोर्ले(22), खारेवाडा(30) आणि बाळळी(21) येथे मोठ्या संख्येने रुग्ण सापडले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या