जुनी पेन्शन हक्क संघटनेचे १९ ला धरणे आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । सिंधुदुर्गनगरी

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्यावतीने विविध मागणीसाठी १९ जानेवारी रोजी दु ३ ते ४ या वेळेत जिल्हा परिषद प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन छेडण्यात येणार आहे. तसे निवेदन संघटना जिल्हाध्यक्ष प्रवीण पाताडे यांनी मंगळवारी सिंधुदुर्ग मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहे.

३० ऑक्टोबर २००५ नंतर सेवेत दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन बंद करण्यात आली आहे. हा अन्याय आहे. तिसऱ्या टप्प्यातील शिक्षक आंतरजिल्हा बदली यादी प्रसिद्ध झालेली असताना पहिल्या टप्प्यात बदली झालेल्या शिक्षकांना अद्याप कार्यमुक्त करण्यात आलेले नाही. त्यांना तात्काळ कार्यमुक्त करावे. उच्य श्रेणी मुख्याध्यापक समायोजन शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार झालेले नाही. यामुळे सवर्गनिहाय बिंदू नामावली सदोष होण्याची शक्यता आहे. पदवीधर शिक्षक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी पदोन्नत्या निकषानुसार झालेल्या नाहीत. त्यामुळे हि कार्यवाही थांबवावी. अशा विविध मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन छेडण्यात येणार आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.