‘सेव्ह मेरीट, सेव्ह नेशन’ च्या वतीने हिंगोलीत घंटानाद आंदोलन

आरक्षणामुळे खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याने आरक्षण रद्द करण्यात यावे, या मागणीसाठी सेव्ह मेरीट सेव्ह नेशन या चळवळीच्या माध्यमातून हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद करुन धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात महिला व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जिल्हाधिकाऱ्यांतर्फे मुख्यमंत्र्यांकडे मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांवर आरक्षणामुळे होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सेव्ह मेरीट सेव्ह नेशन ही चळवळ सुरू झाली आहे. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या दिवशी या चळवळीत सहभागी नागरिक व महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन व घंटानाद आंदोलन केले. गेल्या महिन्यात हिंगोलीमध्ये सेव्ह मेरीट सेव्ह नेशन अशी हाक देत हिंगोलीत मोर्चा काढून शासनाला मागण्या पाठविण्यात आल्या होत्या. मात्र, याकडे दुर्लक्ष झाल्याने मंगळवारी पुन्हा आंदोलन करण्यात आले. खुल्या प्रवर्गातील विद्यार्थी व नागरिकांना इतर समाजाप्रमाणे समान हक्क मिळावा, आरक्षण पूर्णपणे बंद करण्यात यावे, वर्तमान आरक्षण पध्दतीचा फेरविचार करुन आर्थिक निकषांवर सर्व प्रवर्गासाठी व समाजासाठी आरक्षण देण्यात यावे. 26 जानेवारी 2020 रोजी आरक्षणाची मर्यादा संपत असल्यामुळे सरकारने याबद्दल श्वेतपत्रिका जारी करावी, आरक्षणामुळे कोणत्या प्रवर्गाचे नुकसान झाले आहे हे जाहीर करावे. समान न्याय तत्वाचा अवलंब करुन शिक्षणात व शासकीय नोकऱ्यात समान संधी उपलब्ध होण्यासाठी धोरण ठरवावे, युपीएससी परीक्षेच्या नियमात बदल करुन खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे वय 32 वरुन 26 वर्ष केले जाणार असल्याचे समजले असून हा अन्याय होऊ देऊ नये, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. मेरीट वाचवा देश वाचवा हे अभियान राष्ट्राच्या नवनिर्माण व विकासाच्या मागणीसाठी असून केंद्र व राज्य सरकारने या मागण्यांचा विचार करावा, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या