
केंद्रातील भाजपप्रणीत एनडीए सरकारच्या काळात देशभरात पेट्रोल, डिझेल, व घरगुती गॅस या जीवनावश्यक वस्तुंचे दर गगनाला भिडले आहेत. परिणामी सर्वसामान्य जनतेला महागाईचा सामना करावा लागत असल्याने निषेधार्थ शहरातील बसस्थानकासमोरील राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको आंदोलन करत केंद्र सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला.
मंगळवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास सटाणा बसस्थानकासमोर महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मित्र पक्षांच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तब्बल दोन तासांहून अधिक काळ सुरू असलेल्या या रास्तारोको मुळे साक्री – शिर्डी राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या.
यावेळी बागलाणचे तहसिलदार जितेंद्र इंगळे पाटील यांना निवेदन देण्यात आले. त्यात नमूद केले आहे की, देशात महागाईने उच्चांक गाठला असून पेट्रोल डिझेलच्या किमंती आकाशाला भिडल्या आहेत. देशात स्वातंत्र्यानंतर सर्वाधिक बेरोजगारी वाढली असून देशाची अर्थव्यवस्था ढासळली आहे. यासारख्या प्रश्नांकडे केंद्र सरकार लक्ष देण्यास तयार नाही. शेतकऱ्यांचे आंदोलन दडपशाही मार्गाने हाणून पाडण्याचा प्रयत्न करीत आहे. पेट्रोल, डिझेल, व इतर इंधनास जीएसटीमधून वगळावे, अन्यथा आगामी काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
या रास्ता रोको आंदोलनात माजी आमदार संजय चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यंवशी, इंदिरा काँग्रेस तालुकाध्यक्ष साखरचंद कांकरीया, शिवसेना तालुकाप्रमुख सुभाष नंदन, उपजिल्हाप्रमुख लालचंद सोनवणे, शहरप्रमुख जयप्रकाश सोनवणे, शहराध्यक्ष किशोर कदम, यशवंत अहिरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, राष्ट्रवादी युवकचे सुमित वाघ आदीसह कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी सटाणा पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
























































