कृषिमंत्री कोकाटेंमुळे अजितदादा गटाची कोंडी; महायुतीत नाराजी, राजीनाम्यासाठी दबाव

कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंमुळे अजितदादा गटाची महायुतीत कोंडी होऊ लागली आहे. कोकाटेंची वादग्रस्त विधाने आणि त्यांच्या वर्तनामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची डोकेदुखी वाढताना दिसत आहे. महायुतीत कोकाटेंच्या वादग्रस्त भूमिकेमुळे नाराजीचे सूर उमटू लागले असून त्यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकाटे यांचे सभागृहातील वर्तन भूषणावह नसल्याचे सांगत तीव्र नाराजी व्यक्त केल्याने महायुतीत अस्वस्थता वाढली आहे.

फेब्रुवारी महिन्यात कृषीमंत्री कोकाटे यांना एका प्रकरणात नाशिक जिल्हा न्यायालयाने दोषी ठरवविल्यामुळे अजित पवार गट अडचणीत आला होता. कोकाटे यांनी शेतकऱयांविषयी केलेल्या वक्तव्यामुळे तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. ‘‘एखादा भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही; पण इथे आम्ही फक्त एका रुपयात पीक विमा देतो, शेतकरी कर्ज घेतात आणि जाणीवपूर्वक पीक कर्जाची परतफेड करत नाहीत,’’ असा आरोप त्यांनी केला होता. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोकाटे यांना समज दिली होती. त्यानंतरही कोकाटे यांच्या वर्तनात सुधारणा झालेली नाही. आता त्यांच्या रमी प्रकरणाने वाद पेटला आहे.

ढेकळांचे पंचनामे करायचे का?

मे महिन्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कृषीमंत्री कोकाटे गेले होते. या वेळी एका शेतकऱयाने पंचनाम्यांबाबत प्रश्न विचारला असता, कोकाटे यांनी काढलेल्या पिकांचे पंचनामे करून काय करायचं? ढेकळांचे पंचनामे करायचे का? घरात काढून ठेवलेल्या कांद्याचे पंचनामे नियमात बसत नाहीत, या वक्तव्यामुळे शेतकऱयांमध्ये नाराजी पसरली होती.

कर्जमाफीच्या पैशांचे शेतकरी काय करतात?

नाशिकमधील माडसांगवी येथे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी कोकाटे गेले होते. शेतकऱयांनी कर्जमाफीबाबत प्रश्न उपस्थित केले. त्यावर कोकाटे यांनी कर्जमाफी मिळाल्यानंतर जे पैसे मिळतात त्याचं तुम्ही काय करता?  5-10 वर्षं कर्ज भरत नाहीत आणि मग विम्याचे पैसे हवेत, पैसे घेऊन साखरपुडे, लग्न करा, या वक्तव्याने शेतकऱयांचा रोष ओढवला होता.

कृषिमंत्री पद म्हणजे ओसाड गावची पाटीलकी

छत्रपती संभाजीनगर येथे प्रगतिशील शेतकरी मेळाव्यात बोलताना कोकाटे यांनी कृषीमंत्री पद म्हणजे तशी ओसाड गावची पाटीलकी. अजित पवारांनी मला हे मंत्रीपद दिले, असे वक्तव्य केले होते. शेतकऱयांच्या प्रश्नांना सामोरं जाण्याऐवजी त्यांनी कृषीमंत्री पदाला कमी लेखल्याने ते वादात सापडले होते.