
पेट्रोल पंपावरील साडेतीन लाखांची रक्कम घरी नेण्यासाठी कारमध्ये पिशवीत ठेवली असता, दोन चोरटय़ांनी कारसह साडेतीन लाखांची रक्कम लांबविल्याची घटना नगर-संभाजीनगर महामार्गावरील अर्बन बँक कॉलनीत घडली आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मयूर विजयकुमार गांधी (वय 40, रा. अर्बन बँक कॉलनी, नगर-संभाजीनगर महामार्ग) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
गांधी यांचा गजराजनगर चौक येथे पेट्रोलपंप आहे. मंगळवारी (दि. 14) दिवसभर पेट्रोलपंपावर जमा झालेली 3 लाख 50 हजारांची रक्कम घरी नेण्यासाठी त्यांनी कापडी पिशवीत त्यांच्या कारमध्ये ठेवली होती. रात्री साडेअकरा वाजता ते सदर कारमधून त्यांच्या घरी आले. त्या वेळी त्यांच्या घराचे गेट बंद होते. तेव्हा ते कार चालू ठेवून गेट उघडण्यासाठी कारमधून उतरले व गेट उघडून पुन्हा कारकडे येताच तोंडाला रूमाल बांधलेले दोनजण त्यांच्याजवळ आले. त्यातील एकाने गांधी यांना बाजूला ढकलून दिले व त्यानंतर ते दोघे कारमध्ये बसून कार संभाजीनगरच्या दिशेने घेऊन गेले. या प्रकरणी तोफखाना पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला असून, आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत.






























































