
गेल्या दीड वर्षापासून अहिल्यानगरमधील अरणगाव, मेहेराबाद येथील हराळमळा व सोनेवाडी परिसरात मुक्त संचार करीत असलेला बिबट्या अखेर पिंजऱ्यात जेरबंद झाला. वन विभागाकडून हराळ मळा येथे बिबट्यासाठी 28 एप्रिलला पिंजरा लावण्यात आला होता.
आज पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाल्याचे समजताच वन विभागाचे चेमटे, अशोक गाडेकर, वनपाल गायकवाड, प्राणिमित्र हर्षद कटारिया, संदीप ठोमरे, रणसिंग मेजर, सोनेवाडीचे गोरक्ष दळवी, हराळ मळ्यातील सुट्टीवर आलेले बीएसएफचे प्रसाद हराळ आदी घटनास्थळी हजर झाले. अखेर वन अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने बिबट्याला घेऊन गेल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला.
अरणगाव मेहेरबाद येथील हराळ मळ्यात दीड वर्षांपूर्वी अक्षय हराळ यांच्या पाळीव कुत्र्याला जंगली प्राण्याने ठार मारल्याचे निदर्शनास आले होते. तेव्हापासून अधूनमधून अरणगाव, मेहेराबाद, हराळमळा व लगत सोनेवाडी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार सुरू होता. सीआरपीएफ जवान सचिन हराळ यांच्या उसाच्या शेतात 4 दिवसांपूर्वी वासराचा मृतदेह व बिबट्याच्या पावलाचे ठसे आढळले होते. त्यानंतर वन विभागाने त्या ठिकाणी पिंजरा लावला होता. यामध्ये बिबट्या जेरबंद झाला आहे.