
अहिल्यानगर जिल्हा न्यायालयात भरविण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये एका मोटार अपघात दाव्यात तब्बल एक कोटी पाच लाख रुपयांची विक्रमी नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली आहे. अपघातात मृत्यू झालेल्या महेश काठमोरे यांचे वारस आणि विमा कंपनीमध्ये यशस्वी मध्यस्थी होऊन हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
पाथर्डी तालुक्यातील शिरपूर येथील महेश तुकाराम काठमोरे (वय 34) यांचा 20 डिसेंबर 2023 रोजी अहिल्यानगर-कल्याण महामार्गावर मृत्यू झाला होता. कुटुंबाचा आधार गमावल्याने त्यांच्या प्रचात पत्नी प्राजक्ता, अज्ञान मुले, वृद्ध आई-वडील यांच्यावर मोठे संकट कोसळले होते. या पार्श्वभूमीवर वारसांना जलद न्याय व आर्थिक स्थैर्य मिळावे, यासाठी हा खटला लोकअदालतीत ठेवण्यात आला होता.
काठमोरे यांच्या वारसांतर्फे विधिज्ञ सविता कथने यांनी ‘श्रीराम जनरल इन्शुरन्स कंपनी’विरुद्ध नुकसानभरपाईचा दावा दाखल केला होता. यामध्ये विमा कंपनीची बाजू विधिज्ञ अशोक बंग यांनी मांडली. दोन्ही बाजूंच्या वकिलांनी व विमा कंपनीच्या अधिकाऱयांनी सामंजस्याने चर्चा करून एक कोटी पाच लाख रुपये देण्याचे मान्य केले.
या तडजोडीचा धनादेश प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली काठमोरे यांच्या वारसांना सुपूर्द करण्यात आला. यावेळी जिल्हा न्यायाधीश एम. एस. लोणे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव योगेश पैठणकर आणि पॅनेल सदस्य विधिज्ञ सुरेश लगड उपस्थित होते.




























































