अहिल्यानगरची दळणवळण व्यवस्था ठप्प होण्याची भीती; एम.एच.16 आरटीओ कार्यालयातील व्यावसायिक वाहनांची फिटनेस प्रक्रिया बंद

अहिल्यानगर येथील एम.एच. 16 प्रादेशिक परिवहन कार्यालयात लक्झरी बस, स्कूल बस व इतर व्यावसायिक वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया 3 जानेवारी 2026 पासून बंद असल्याने संपूर्ण जिल्ह्यातील दळणवळण व्यवस्था धोक्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर अहमदनगर बस ओनर्स ऍण्ड ट्रव्हल्स असोसिएशनच्या वतीने प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना निवेदन देऊन फिटनेस प्रक्रिया तातडीने सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.

अहिल्यानगर आरटीओ कार्यालयात एकूण 10 लाख 85 हजार 563 वाहनांची नोंदणी असून, त्यापैकी 9 लाख 30 हजार 237 खासगी वाहने आहेत. खासगी वाहनांना 15 वर्षांसाठी फिटनेस दिला जातो. मात्र, 1 लाख 55 हजार 326 व्यावसायिक वाहने-लक्झरी बस, स्कूल बस, एसटी, रिक्षा, ट्रक, टँकर व इतर मालवाहतूक वाहनांना मोटार वाहन कायदा 1988 कलम 62(1) नुसार दरवर्षी फिटनेस घेणे बंधनकारक आहे. फिटनेस नसलेल्या वाहनांना रस्त्यावर चालवण्यास कायद्याने मनाई आहे.

आरटीओ कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार नवीन एटीएस मशीन सुरू झाल्यानंतरच फिटनेस प्रक्रिया सुरू होणार असून, त्यासाठी अंदाजे सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे. सध्या दररोज सरासरी 64 वाहने, तर महिन्याला सुमारे 1500 वाहनांचे फिटनेस केले जातात. सहा महिन्यांत अंदाजे 9 हजारांहून अधिक वाहने एकतर उभी राहतील किंवा नाईलाजाने विनाफिटनेस रस्त्यावर धावतील, अशी गंभीर परिस्थिती निर्माण होणार आहे.

अहिल्यानगर आरटीओ हद्दीत सध्या 812 स्कूल बसेस, 1216 लक्झरी बसेस, 150 एमआयडीसी कामगार वाहतूक बसेस, तसेच 8366 ऑटोरिक्षा प्रवासी वाहतूक करतात. याशिवाय दररोज 500 भाजीपाला वाहने, 350 दूध टँकर, 760 पेट्रोलियम टँकर आणि 400 घरगुती गॅस वाहने जिह्यातून राज्यातील विविध भागांत जातात. फिटनेस बंद राहिल्यास शाळा, प्रवासी वाहतूक, औद्योगिक कामगार व अत्यावश्यक मालवाहतूक पूर्णतः विस्कळीत होण्याची शक्यता आहे.

शहरातील दळणवळण व्यवस्था ठप्प होऊ नये, शालेय विद्यार्थ्यांची, प्रवाशांची व कामगारांची गैरसोय टळावी, यासाठी अहिल्यानगर एमएच 16 आरटीओ कार्यालयातील फिटनेस प्रक्रिया तातडीने सुरू करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष नावेद शेख, सचिव रमेश बोसले, रवी जोशी, जयकुमार बोगावत, अल्ताफ सय्यद, निखिल जाधवर, अरुण गांगर्डे, अनिल काशीद, दिलीप कुलकर्णी, विवेक सूर्यवंशी, अमित लोणकर, आकाश बंधुले, भूषण तळेकर, वसीम शेख, फिरोज शेख, नजर खान, प्रवीण बटावणेकर, दिनेश चौरे, हनुमान दारकुंडे, विकास दळवी, रमेश खेडकर, गणेश राजनी, सूरज लोंढे, विशू डोळे, बालम पठाण, सुनील गडाख, इमरान खान, अमोल गायकवाड, स्वप्नील जबे, राहुल कारखेले, मारुती आव्हाड आदी उपस्थित होते.