गंभीर गुन्ह्यातील 6 डॉक्टर अद्याप फरारीच! मृतदेहाची परस्पर विल्हेवाट, पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत नगरकरांमध्ये प्रचंड संताप

अहिल्यानगर शहर हादरवून सोडणाऱ्या धक्कादायक प्रकारात उपचारानंतर मृत्यू झालेल्या मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावल्याप्रकरणी सहा डॉक्टरांसह एका चालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, गुन्हा दाखल होऊन सहा दिवस उलटले तरी सर्व डॉक्टर फरारी असून, अद्याप एकाही आरोपीस अटक झालेली नाही. त्यामुळे या घटनेवरून पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत नगरकरांकडून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.

डॉ. गोपाळ बहुरूपी, डॉ. सुधीर बोरकर, डॉ. अक्षयदीप झावरे, डॉ. सचिन पांडुळे, डॉ. मुकुंद तांदळे या डॉक्टरांसह एका वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरीही पोलिसांची कारवाई शून्य असल्याने संताप व्यक्त होत आहे.

फिर्यादी अशोक खोकराळे यांच्या वडिलांना कोरोनाकाळात आजारपणामुळे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. सुरुवातीला डॉ. पांडुळे यांनी उपचार सुरू केले, त्यानंतर त्यांनी रुग्णाला डॉ. बहुरूपी यांच्या क्लिनिककडे पाठविले. तेथे तथाकथित उपचारांच्या नावाखाली रुग्णाला हातपाय बांधून ठेवण्यात आले, असा धक्कादायक आरोप आहे. यानंतर काही वेळातच रुग्णाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, चार वर्षांपासून अशोक खोकराळे यांना त्यांच्या वडिलांचा मृतदेहही मिळालेला नाही. उलट त्या मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्यांनी न्यायालयीन लढा सुरू केला होता. या प्रकरणात संभाजीनगर खंडपीठाने अखेर संबंधित सहा डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली होती; परंतु पोलिसांकडून अपेक्षित ती तत्परता दिसून न आल्याने नागरिकांचा संताप ओसंडून वाहत आहे.

फिर्यादी अशोक खोकराळे यांचे उद्यापासून आंदोलन

डॉक्टर आरोपींना अटक होत नसल्याने आता फिर्यादी अशोक खोकराळे हे येत्या सोमवारपासून (दि. 27) अनोखे आंदोलन करणार आहेत. जोपर्यंत आरोपी डॉक्टरांना पोलीस पकडत नाही तोपर्यंत तोंडावर काळा कपडा बांधून हातात बेडय़ा घालून आंदोलनाला बसणार असल्याचे खोकराळे यांनी सांगितले. आता याप्रकरणात अनेक पेशंटचे नातेवाईक सहभागी होणार असल्याची माहिती खोकराळे यांनी दिली आहे. ज्या नागरिकांना खोकराळे यांच्याप्रमाणे अनुभव आले आहेत, ते नागरिक आंदोलनात सहभागी होणार आहेत.

शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनीदेखील या प्रकरणात पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. गुन्हा नोंदवूनही अटक नाही, याचा अर्थ कुणाचे तरी संरक्षण सुरू आहे का? असा थेट सवाल केला आहे. संबंधित प्रकरणाची गांभीर्य लक्षात घेता तातडीने कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात येत आहे.

28 ऑक्टोबरला सुनावणी

तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या गुह्यातील आरोपी डॉ. गोपाल बहुरूपी, डॉ. सुधीर बोरकर, डॉ. मुकुंद तांदळे, डॉ. असदीप झावरे, डॉ. सचिन पांडुळे आदींचा समावेश आहे. यातील डॉ. बहुरूपी आणि बोरकर यांनी जिल्हा न्यायालयात धाव घेऊन अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. त्यावर आता 28 ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे.