Ahilyanangar news – आई ‘वाघिण’ बनली अन् बिबट्याशी झुंज देत 5 वर्षांच्या मुलाची सुटका केली, शिंगणापूरमधील थरार

पोटच्या गोळ्याला वाचवण्यासाठी आई कोणत्याही थराला जाऊ शकते हे आपण ऐकले असेलच. याचीच प्रचिती कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर येथे आली असून आईने वाघिणीचे रुप घेत थेट बिबट्याशी झुंज दिली आणि 5 वर्षांच्या मुलाची सुटका केली.

सर्वत्र दिवाळीचा झगमगाट सुरू होता आणि अचानक एक भीषण किंकाळी घुमली. घराबाहेर खेळणाऱ्या पाच वर्षांच्या दिव्यांश पवार याच्यावर बिबट्या झडप घातली. मुलाची किंकाळी ऐकून आई मदाबाई पवार यांनी क्षणाचाही विचार न करता बिबट्यावर झडप घातली. त्यांनी जीवाच्या आकांताने बिबट्याची शेपटी ओढली. अचानक झालेल्या या कृतीमुळे बिबट्याही दचकला आणि त्याने दिव्यांशला सोडून जंगलात पळ काढला. या हल्ल्यात दिव्यांश गंभीर जखमी झाला असून त्याला कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर नगर जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

दरम्यान, जखमी झालेल्या दिव्यांशला रुग्णालयात नेण्यासाठी 108 रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध न झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.

वन विभागाचे दुर्लक्ष

कोपरगाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांचा संचार वाढला आहे. जनावरे, पाळीव प्राणी आणि आता निरागस मुलंसुद्धा असुरक्षित झाली आहेत. यापूर्वी कोल्हे वस्ती आणि टाकळी फाटा परिसरातही बिबट्यांनी मानवी वस्तीवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या होत्या. याकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत असून कोपरगाव वन परिक्षेत्रात गेल्या वर्षभरापासून पूर्ववेळ अधिकारी नाही, त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला असून पूर्णवेळ अधिकारी नेमून बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणई केली आहे.