
नगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची दैनंदिन संख्या वाढत असल्याने राज्य शासनाने येथील कोरोना निर्बंध कायम ठेवले आहेत. याशिवाय कडक निर्बंधांचा निर्णय स्थानिक प्रशासनावर सोपविण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्याची वाटचाल कडक निर्बंधांच्या दिशेने सुरू असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, ग्रामीण भागाच्या तुलनेत नगर शहरात सध्या रुग्णवाढ दर कमी आहे. मात्र, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कोरोना चाचण्यांची संख्या आता दररोज दीड हजार ते दोन हजार करण्यात येणार आहे. यासंबंधीचा आदेश मनपा आयुक्त शंकर गोरे यांनी आरोग्य यंत्रणेला दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. आठवडाभरापासून दररोज आठशे ते एक हजारांच्या दरम्यान कोरोनाबाधित आढळून येत आहेत. दोन दिवस ही संख्या हजारांच्या पुढे गेली होती. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येने जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. जिल्ह्यात कोरोनाच्या तिसऱया पातळीचे निर्बंध लागू राहतील, असे शासनाने स्पष्ट केले आहे. हा निर्णय राज्यातील 11 जिल्ह्यांसाठी घेण्यात आला आहे. यात नगर जिल्ह्याचा समावेश आहे.
मनपाच्या वतीने शहरात प्राथमिक आरोग्य केंद्र, तसेच रेल्वे स्टेशन व बसस्थानकात चाचण्या करण्यात येत आहेत. सुमारे नऊशे ते हजारपर्यंत चाचण्या होत असून, यात वाढ करण्यात येणार आहे. दररोज दीड हजार ते दोन हजार चाचण्या करण्यात येणार आहेत, असे आयुक्त गोरे यांनी सांगितले.
























































