
मागील दहा ते बारा वर्षांपासून चर्चेत असलेल्या नगरच्या स्टेशन रस्त्यावरील उड्डाणपुलाच्या प्रत्यक्ष कामाला 3 आठवडय़ांपूर्वी सुरुवात झालेली असून, अशोका हॉटेलसमोरील उड्डाणपुलाच्या पहिल्या पिलरची उभारणी सुरू झाली आहे. अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा वापर होत असल्याने कामाला वेग आला आहे. पहिल्या टप्प्यात अशोका हॉटेल ते स्टेट बँक चौकापर्यंत खांब उभारण्याचे काम सुरू असून, त्यासाठी रस्त्याच्या मध्यभागी पत्रे लावण्यात आले आहेत.
कल्याण ते विशाखापट्टणम हा राष्ट्रीय महामार्ग नगर शहरातून भिंगारमार्गे जात असल्याने या महामार्ग कामाच्या खर्चातून शहरातील स्टेशन रोड परिसरात पहिल्या टप्प्यातील उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. पुणे रस्त्यावरील सक्कर चौकातील शिल्पा गार्डन ते भिंगारला जाणाऱया रस्त्यावरील स्टेट बँक चौकापर्यंत हा पहिल्या टप्प्यातील उड्डाणपूल होणार आहे. यासाठी 325 ते 350 कोटी रुपये खर्च होणार आहेत. उड्डाणपुलाच्या कामासाठी संरक्षण मंत्रालयाने जुलैमध्ये ना हरकत प्रमाणपत्र दिले होते. त्यानंतर या कामाचे औपचारिक भूमिपूजन झाले.
अहमदाबाद येथील बी. आर. अग्रवाल इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. या संस्थेने आता उड्डाणपुलाच्या प्रत्यक्ष कामाला 3 आठवडय़ांपूर्वी सुरुवात केली आहे. सुमारे 3.08 किलोमीटर लांबीच्या या उड्डाणपुलासाठी 85 खांब आणि 2 रॅम्प उभारले जाणार आहेत. या कामाला अडथळा येऊ नये म्हणून तसेच वाहतूकही सुरळीत चालू राहावी म्हणून रस्त्याच्या मध्यभागी आवश्यक जागेला पत्र्यांचे कुंपण घातले जात आहे. पहिल्या टप्प्यात अशोका हॉटेल ते स्टेट बँक चौकापर्यंत काम सुरू करण्यात आले आहे.



























































