
संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले हरिश्चंद्रगड कळसूबाई अरण्यातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आणि ‘भटक्यांची पर्यटनपंढरी’ म्हणून गणल्या जाणाऱ्या हरिश्चंद्रगडावरील मंदिर परिसर सौरदिव्यांनी उजळून निघणार आहे. महाशिवरात्रीच्या तोंडावर हा प्रकल्प पूर्ण झाला तर महाशिवरात्रीच्या दिवशी महाशिवाचा हा पर्वत दिव्यांच्या लखलखाटाने उजळून निघणार आहे. हरिश्चंद्रगड वन्यजीव विभाग या गडावर प्रत्येकी सुमारे एक हजार 500 वॅटचे तीन ‘सोलर ट्री’ युनिट उभारणार असून, हे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
सह्याद्रीच्या पर्वतरांगांत वसलेल्या आणि समुद्रसपाटीपासून चार हजार 670 फूट उंचीचा असणाऱ्या हरिश्चंद्रगडाला ऐतिहासिक आणि पौराणिक वारसा लाभल्याने गडावर भाविकांचा राबता कायमच असतो. येथील निसर्गसौंदर्य, मंदिरे, गुहा, शिलालेख, कोकणकडा यांमुळे तीनही ऋतूंत येथे पर्यटकांची रेलचेल असते. भाविक आणि पर्यटक या गडावर अनेक वेळा मुक्कामी असतात. मात्र, वीज पोहोचलेली नसल्यामुळे गडावर रात्रीच्या वेळी अंधारच असतो.
काही वर्षांपूर्वी ‘महावितरण’ कंपनीने या गडावर विद्युतपुरवठा करण्यासाठी प्रयत्न केला होता. मात्र, त्यात अनेक अडचणी आल्याने हा प्रस्ताव बारगळला होता. आता वन्यजीव विभागाने यात लक्ष घातल्याने गडावरील विजेचा प्रश्न सुटणार असून, हरिश्चंद्रगड सौरदिव्यांनी उजळून निघणार आहे. यामुळे येथील पर्यटनाला चालना मिळणार आहे.
उभारण्यात येणारे प्रत्येक युनिट ‘वाय’ आकाराचे असेल. याच्या तीन मीटर मध्यावर डाव्या बाजूस चार मीटरचा, तर उजव्या बाजूस साडेचार मीटरचे पिलर असणार असून, यावर एकूण 395 वॅटचे चार पॅनेल बसविण्यात येणार आहेत. या युनिटमध्येच दीड किलो वॅटच्या आणि पाच वर्षे हमी असणाऱ्या दोन बॅटरी बसविण्यात येणार आहेत. यानुसार गडावर तीन ‘सोलर ट्री’ उभारण्याला सुरुवात करण्यात आली आहे.
गडावर वीज उपलब्ध व्हावी, यासाठी स्थानिकांनी वन्यजीव विभागास आग्रह केला. त्यानुसार या विभागाने पाठपुरावा करून जिल्हा वार्षिक नियोजनातून यासाठी निधी उपलब्ध केला आहे. यानुसार या सर्व युनिटचे सुटे भाग पाचनई येथे आणण्यात आले. ते गडावर नेण्यासाठी कोणी तयार होत नसल्याचे पाहून नाशिक वन्यजीव विभागाचे सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे, वनक्षेत्रपाल डी. डी. पडवळे, अमोल आडे, वनपाल शंकर लांडे यांनी ग्रामस्थांची बैठक घेतली. त्यानंतर ग्रामस्थांनी सुमारे 800 किलो वजनाचे हे साहित्य गडावर पोहोचविले. यातील एक युनिट हरिश्चंद्रेश्वराच्या मंदिरासमोर, तर दुसरे युनिट गणपती गुहेच्या समोर उभारण्यात येणार असून, तिसरे युनिट कोकणकडा किंवा केदारेश्वर लिंगाच्या मंदिरासमोर उभारण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.
























































