
वरिष्ठ अधिकाऱयांच्या जाचाला कंटाळून करंजी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात कार्यरत असलेले समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. गणेश गोवर्धन शेळके (वय 36) यांनी आज दुपारी उपकेंद्रात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी शेळके यांनी सुसाइड नोट लिहून ठेवली होती. यामध्ये तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवान दराडे, तहसीलदार व जिल्हाधिकारी माझ्या आत्महत्येस जबाबदार असल्याचे म्हटले आहे. या घटनेने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.
डॉ. गणेश शेळके हे मंगळवारी नेहमीप्रमाणे उपकेंद्रात आले. काही वेळाने वरिष्ठ अधिकाऱयांनी तीसगावला बोलाविले आहे, असे सांगून ते बाहेर पडले. थोडय़ा वेळाने ते परत आले तेव्हा तणावाखाली असल्याचे कर्मचाऱयांच्या लक्षात आले. यानंतर शेळके हे पेन-कागद घेऊन आले. ‘टॅब जमा करा; मी राजीनामा देणार आहे,’ असे सांगून ते उपकेंद्रातील दुसऱया खोलीत गेले. त्यांनी आतून दरवाजा लावून घेतला. काही वेळाने आरोग्यसेविकेने जेवणासाठी शेळके यांना आवाज दिला. मात्र, आतून प्रतिसाद आला नाही. आरोग्यसेविकेने खिडकीतून पाहिले असता, डॉ. शेळके यांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.
आरोग्यसेविकेने तत्काळ वरिष्ठ अधिकारी आणि पोलिसांना माहिती दिली. पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी खोलीचा दरवाजा तोडून शेळके यांचा मृतदेह खाली घेऊन तपासणी केली असता, त्यांच्या खिशात चिठ्ठी आढळली.
या चिठ्ठीमध्ये डॉ. शेळके यांनी आत्महत्येस तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवान दराडे, तसेच प्रशासन सेवेतील तहसीलदार, जिल्हाधिकारी जबाबदार असल्याचे म्हटले आहे. अतिरिक्त कामाचा ताण, वेळेत पगार नाही, तसेच पगारकपातीची धमकी यामुळे मी आत्महत्या करीत असल्याचे चिठ्ठीत लिहिले असल्याचे पोलिसांनी सांगितले.





























































