कोल्हापूर आणि नगरमध्ये वीकेंड लॉकडाऊन संपताच खरेदीसाठी नागरिकांची गर्दी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत वीकेंड लॉकडाऊनला पश्चिम महाराष्ट्रात नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मात्र, प्रशासन व व्यापारी संघटनांतील समन्वयाच्या अभावाने आज सर्वत्र सोशल डिस्टन्सचा चांगलाच फज्जा उडाला. कोल्हापूर, नगरमधील बहुतांश सरसकट सर्वच दुकाने खुली राहिल्याने सकाळपासूनच खरेदीसाठी नागरिकांची गर्दी उसळली होती. रस्त्यावर ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. उद्याच्या गुढीपाडवा सणाच्या निमित्त आणि संभाव्य लॉकडाऊनच्या भीतीने नागरिकांची झालेली गर्दी चिंता वाढवणारी होती.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्य सरकारने वीकेंड लागू केला होता. त्यामुळे शुक्रवारी सायंकाळी 8 नंतर सोमवार सकाळपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात  सर्वत्र शुकशुकाट होता. नेहमी वर्दळीने गजबजलेले रस्ते ओस पडले होते. आज मात्र वर्दळ पूर्ववत झाल्याचे दिसून आले. गुढीपाडवा सणाची खरेदी तसेच संभाव्य लॉकडाऊनच्या भीतीने अन्नधान्य खरेदी करण्यासाठी आज अक्षरशः गर्दी उसळली होती. व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱयांच्या चिथावणीने सरसकट सर्वच दुकाने उघडी राहिली.

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर खरेदीस पैसे काढण्यासाठी अनेकांनी बँकांच्या दारात रांगा लावल्या होत्या. महापालिका इमारत, अंबाबाई मंदिर, महाद्वार रोडवर आदी बाजारपेठांत खरेदीसाठी नागरिकांनी तुफान गर्दी केली होती. गर्दी नियंत्रित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाची यंत्रणा अत्यंत तोकडी पडली होती.

नगर शहरात फक्त किराणा आणि भाजीपाल्याची विक्री सुरू होती. काहीजण दुकाने उघडण्यासाठी गेले होते. मात्र, निर्बंध कायम असल्याने त्यांना माघारी परतावे लागले. शहरातील कापड बाजार, गंज बाजार यांसह किकिध बाजारपेठांतील दुकाने बंद होती. दुपारनंतर भाजीपाला संपला. त्यामुळे अनेकजण माघारी फिरले. तरीही रस्त्यावर मोठय़ा प्रमाणावर गर्दी दिसून येत होती.