
केंद्र सरकारचा महत्त्वाकांशी प्रकल्प असणाऱया ‘राष्ट्रीय जलजीवन मिशन योजने’च्या अंमलबजावणीत वाढत्या तक्रारींमुळे जिल्हा परिषद प्रशासनाने या योजनेच्या कामाची एकाचवेळी पाहणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार गेले दोन दिवस जिल्हा परिषदेचे विभागप्रमुख तालुकानिहाय जिह्याच्या विविध भागांत दौऱयावर आहेत. हे विभागप्रमुख ‘जलजीवन योजने’च्या पाण्याचे स्रोत, योजनेत वापरलेले पाईप, टाकलेल्या पाईपची खोली, पाण्याच्या टाक्या, वितरण व्यवस्था आदींच्या कामाची पाहणी करत आहेत. या पाहणीचा अहवाल ते मुख्य कार्यकारी अधिकाऱयांना सादर करणार आहेत.
मुख्य कार्यकारी अधिकाऱयांसह अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱयांनी रँडम पद्धतीने तालुकानिहाय जलजीवनच्या कामांना भेटी देत पाहणी केली. जिल्हा परिषदेच्या वतीने सर्वांत मोठा प्रकल्प म्हणून जलजीवन योजना राबवण्यात येत आहे. योजनेसाठी नगर जिह्यात सुमारे अडीच हजार कोटींचे बजेट आहे. केंद्राच्या निधीतून जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभाग ही योजना राबवत असून, योजनेत समाविष्ट असणाऱया गावांत पाणी योजनेसाठी निविदा प्रक्रिया होऊन प्रत्यक्षात कामाला सुरुवात झालेली आहे. मात्र, योजनेच्या अंमलबजावणीत सुरुवातीपासून आरोप होत असून, दररोज होणारे आरोप आणि तक्रारी यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी आशीष येरेकर यांनी एकाचवेळी ‘जलजीवन योजने’च्या कामाची जिल्हा परिषदेच्या अधिकाऱयांमार्फत पाहणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार गेले दोन दिवस जिल्हाभर पाहणी सुरू करण्यात आली. यासाठी जिल्हा परिषदेच्या प्रत्येक विभागप्रमुखाला तालुका ठरवून देण्यात आला आहे. पाहणीसाठी आठ मुद्दय़ांवर आधारित तक्ता तयार करण्यात आला आहे.
तांत्रिक मुद्दा…अतांत्रिक अधिकारी
जिल्हा परिषदेत पाणीपुरवठा, बांधकाम, लघुपाटबंधारे विभाग वगळता अन्य विभाग हे अतांत्रिक विभाग आहेत. जलजीवन योजना ही पाणी योजना असून, योजनेत पाण्याच्या पाईपलाईनची जाडी ते टाकण्यात आलेले पाईप, पाणी योजनेचे व्हॉल, विविध बांधकाम, मंजूर योजनेचा स्रोsत, उद्भव, पाणी योजनेच्या उद्भव या ठिकाणी असणाऱया पाण्याचा दाब, पाणी व्यवस्था, पाणी वितरण व्यवस्थेच्या टाकीपासून प्रत्यक्षात संबंधित कनेक्शनपर्यंत पाण्याचा दाब यांसह अन्य बाबी या तांत्रिक असून, कागदावर आणि प्रत्यक्षात योजनेत फरक असू शकतो. मात्र, अशा या तांत्रिक बाबींची पाहणी अतांत्रिक अधिकाऱयांकडून करण्यात आली.



























































