
नगर जिल्ह्यात संघटित गुन्हेगारी करणाऱया दोन टोळ्यांमधील 12 गुन्हेगारांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोक्का) कायद्यान्वये कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली आहे.
काळे टोळीतील साहेबा गजानन काळे (टोळीप्रमुख, वय 48, रा. दहिगाव, ता. नगर), परमेश्वर रविकांत काळे (वय 20, रा. घोसपुरी, ता. नगर), शिवदास रामदास भोसले (वय 23, रा. घोसपुरी, ता. नगर) हे तिघे अटकेत असून विजय गजानन काळे (रा. दहिगाव, ता. नगर), समाधान गजानन काळे (रा. दहिगाव, ता. नगर) हे दोघे फरार आहे. या पाच जणांच्या टोळीविरुद्ध ‘मोक्का’अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
शिंदे टोळीतील संतोष राघू शिंदे (टोळीप्रमुख), चंदू भाऊसाहेब घावटे (वय 28), राजेंद्र बबन ढवळे (वय 31, तिघे रा. राजापूर, ता. श्रीगोंदा), चेतन काळूराम कदम (वय 21), सागर विनोद ससाणे (वय 21, दोघे रा. देवदैठण, ता. श्रीगोंदा), राजू उर्फ राजेंद्र मधुकर उबाळे (रा. कुरुंद, ता. पारनेर), शफिक शब्बीर शेख (वय 34, रा. नारायण गव्हाण, ता. पारनेर) या सातजणांच्या टोळीविरुद्ध ‘मोक्का’अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी नगर जिल्ह्यातील गुन्हेगारीचा बीमोड करण्यासाठी विविध गुन्हेगारांची माहिती संकलित केली असून, संघटित गुन्हेगारी टोळ्यांविरुद्ध ‘मोक्का’अन्वये कारवाई करण्याचे संकेत दिले होते. नगर जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत पाच टोळ्यांवर अशी कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर विविध टोळ्यांवरील कारवाईचे प्रस्ताव नाशिक परिक्षेत्राकडे पाठविण्यात आले होते.
नगर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये साहिबा काळे याच्यासह त्याच्या टोळीने दरोडय़ाचे गुन्हे केले होते. या टोळीविरुद्ध मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यासाठी प्रभारी अधिकाऱयांनी 8 सप्टेंबर रोजी नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविला होता. या प्रस्तावाला 15 ऑक्टोबर रेजी मंजुरी देण्यात आली आहे. या टोळीने नगर तालुका पोलीस स्टेशनसह, कोतवाली, सोनई, पुणे जिल्ह्यातील दौंड, दौंड रेल्वे पोलीस स्टेशनच्या हद्दीत दरोडे, जबरी चोरी, गंभीर दुखापत असे अनेक गुन्हे संघटितपणे केले आहेत.
शिंदे टोळीवर नगर जिल्ह्यातील बेलवंडी, सुपा, तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीत तसेच पुणे जिल्ह्यातील शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सशस्त्र दरोडा, गंभीर दुखापत करणे, ठार मारण्याचा प्रयत्न करणे, चोरी करणे, असे गुन्हे दाखल आहेत. या टोळीविरोधात दाखल करण्यात आलेल्या प्रस्तावाला नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाने 15 ऑक्टोबर रोजी मंजुरी दिली आहे.
गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱया या दोन्ही टोळ्यांविरुद्ध वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. नगर जिल्हय़ात अशा प्रकारचे गंभीर गुन्हे करणाऱया टोळ्यांवर आगामी काळात ‘मोक्का’अन्वये कारवाई करण्यात येणार आहे.
– मनोज पाटील, पोलीस अधीक्षक, नगर.



























































