Air India Plane Crash नंतर 33 पैकी 22 ड्रिमलायनर विमानांची तपासणी पूर्ण, महत्त्वाची माहिती आली समोर

मागील आठवड्यात झालेल्या ड्रिमलायनर अपघातानंतर एअर इंडियाने आपल्या ताफ्यातील 22 बोईंग 787 विमाने (ड्रिमलायनर) यांची विशेष तपासणी पूर्ण केली आहे. एअर इंडियाच्या ताफ्यात एकूण 33 ड्रिमलायनर विमाने आहेत. यातील पहिले विमान 2012 मध्ये खरेदी करण्यात आले होते. तर अपघातग्रस्त विमान 2014 पासून कार्यरत होते.

डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन (DGCA) च्या सूचनेनुसार, एअर इंडियाला GEnx इंजिन असलेल्या बोईंग 787 विमानांवर अधिकची देखभाल तपासणी करणे बंधनकारक करण्यात आले होते. यामध्ये टेक-ऑफ पॅरामीटर्स, इलेक्ट्रॉनिक इंजिन कंट्रोल यंत्रणेची चाचणी आणि इंजिन इंधन प्रणालीची पडताळणी याचा विशेष करून समावेश करण्यात आला होता, अशी माहिती इकॉनॉमिक टाइम्सच्या (ET)संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी ET ला दिलेल्या माहितीनुसार, तपासणीमध्ये कोणतीही मोठी तांत्रिक त्रुटी आढळली नसली, तरी या प्रक्रियेमुळे काही उड्डाणे रद्द करावी लागली. यात सिडनी आणि मेलबर्न या मार्गावरील ड्रिमलायनर सेवा देखील समाविष्ट आहे.

‘उड्डाण रद्द होण्यामागे तपासणीसाठी लागणारा अधिक वेळ आणि इराणाचे हवाई क्षेत्र बंद असणे, हे दोन्ही महत्त्वाचे घटक आहेत’, असे एअर इंडियाच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

इस्रायलने इराणवर हल्ले केल्यानंतर आणि इराणकडून प्रत्युत्तर दिल्यानंतर गेल्या शुक्रवारपासून अनेक विमान कंपन्यांनी मध्यपूर्वेतील प्रमुख हवाई मार्ग टाळले आहेत.

शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत हिंदुस्थानी विमान वाहतूक अधिकाऱ्यांनी सांगितले की, कॅप्टन सुमीत सभरवाल यांनी गुरुवारी दुपारी 1:39 वाजता अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच एअर ट्रॅफिक कंट्रोलला (ATC) ‘मे डे’ सिग्नल दिला होता.

विमानतळाच्या नियंत्रण कक्षाकडून प्रतिसाद दिल्यानंतर मात्र वैमानिकाने कोणतेही उत्तर दिले नाही आणि काही क्षणातच विमानाला अपघातच झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

या अपघातानंतर केंद्र सरकारने देशाचे हवाई सुरक्षा धोरण पुनरावलोकन करण्याचा निर्णय घेतला आहे. गृहमंत्रालयाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे.

नवीन नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी शनिवारी जाहीर केले की, सदर समिती सध्या अस्तित्वात असलेल्या स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर्स (SOPs) चे परीक्षण करणार असून, भविष्यात अशा अपघातांपासून बचावासाठी नव्या उपाययोजना सुचवणार आहे.

‘या तपासणीला स्वतंत्रपणे कार्य करण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे, जी एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोच्या (AAIB) अधिकृत चौकशीपेक्षा वेगळी आहे. ही प्रक्रिया अपघाताच्या चौकशीला अधिक बळ देईल’, असे नायडूंनी सांगितले.

Air India Dreamliner Crash: Inspections Completed, Flights Canceled, India Plans New Aviation Safety Policy

Keywords: Air India 787 crash, Boeing Dreamliner accident India, aviation safety India, DGCA inspection, Captain Sumeet Sabharwal, Air India flight cancellations, Iran airspace closure, aviation SOP revision, Ram Mohan Naidu aviation news