
बंगळुरूहून वाराणसीला जाणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानात एका प्रवाशाने अचानक कॉकपीटचे दार उघडण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे विमानात भीतीचे वातावरण निर्माण झाले. विशेष म्हणजे प्रवाशाकडे कॉकपीटचा पासकोडही होता. हायजॅक होण्याच्या भीतीने कॅप्टनने दार उघडले नाही. या घटनेनंतर आरोपीसह त्याच्या आठ साथीदारांना सीआयएसएफच्या ताब्यात देण्यात आले.
संबंधित प्रवासी टॉयलेटला जाण्याच्या बहाण्याने कॉकपीटजवळ गेला आणि दार उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र सुदैवाने कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. विमानात कडक सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या आहेत. लँडिंगनंतर तत्काळ अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती देण्यात आली असून सध्या चौकशी सुरू आहे, अशी माहिती एअर इंडियाने दिली आहे.
प्रवाशाकडे कॉकपीटचा पासवर्ड आला कसा?
विमानाने उड्डाण घेतल्यानंतर थोडय़ाच वेळात प्रवाशाने टॉयलेटला जाण्याच्या बहाण्याने कॉकपीटचे दार उघडण्याचा प्रयत्न केला. पासकोड टाकल्यावर पायलटला समजले, मात्र हायजॅक होण्याच्या शंकेने पायलटने दार उघडले नाही. प्रवाशाला कॉकपीटचा पासकोड कसा माहीत होता, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.