
गुजरातच्या अहमदाबाद येथे गुरुवारी दुपारी एअर इंडियाचे AI171 हे प्रवासी विमान कोसळले. अपघातावेळी विमानात 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर होते. दुपारी 1.38 वाजता हे विमान मेघाणीनगर भागात कोसळले. यात दुर्घटनेत विमानातील 229 प्रवासी आणि 12 क्रू मेंबरचा दुर्दैवी मृत्यू झाला. विमानातील इंधनामुळे मोठा स्फोट होऊन लागलेल्या आगीत जवळपास सर्वांचाच कोळसा झाला. मृतदेह ओळखूही येत नसल्याने त्यांची डीएनए चाचणी करण्यात येत आहे. परंतु, या जीवघेण्या अपघातातून विश्वासकुमार रमेश नावाचा एक प्रवासी सुदैवाने बचावला. त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इतर जखमींसह त्यांचीही भेट घेतली. यावेळी त्यांनी विमान अपघातावेळी नक्की काय घडले, ते कसे वाचले, काय चमत्कार झाला याची माहिती दिली.
विश्वासकुमार रमेश हे हिंदुस्थानी वंशाचे ब्रिटीश नागरीक आहेत. कुटुंबियांची भेट घेण्यासाठी भावासोबत ते हिंदुस्थानमध्ये आले होते. भेट घेतल्यानंतर भावासह त्यांनी अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एअर इंडियाचे विमान पकडले होते. त्यांचा सीट क्रमांक 11A हा होता. विमान कोसळल्यानंतर ते आश्चर्यकारकरित्या बचावले. सुरुवातीला त्यांनी विमानातून उडी मारल्याचे वृत्त आले होते, मात्र आता माध्यमांशी प्रतिक्रिया देताना त्यांनी आपण विमानातून उडी मारलीच नव्हती असे सांगितले.
विमानाने उड्डाण केले तेव्हाच काहीतरी गडबड असल्याचे जाणवले. 5-10 सेकंद सर्वकाही थांबल्यासारखे वाटले. मग एकदम शांतता झाली अन् विमानातील हिरवे, पांढरे लाईट्स ऑन झाले. असे वाटत होते टेकऑफसाठी पायलट पूर्ण जोर लावत होता. पण काही क्षणात विमान हॉस्टेलच्या इमारतीमध्ये घुसले, असे विश्वासकुमार रमेश यांनी सांगितले.
माझी सीट विमानाच्या ज्या भागात होती, तो भाग इमारतीच्या खालच्या भागाला धडकला. विमानाच्या वरच्या भागात आग लागली आणि तिथे अनेक लोक अडकले. विमान इमारतीवर आदळल्यानंतर मला हादरा बसला आणि मी सीटसह बाहेर फेकलो गेलो. इमर्जन्सी दरवाजा तुटला होता आणि कसाबसा सीट बेल्ट काढला. माझ्या आजूबाजूला सर्वकाही जळाले होते. समोर दोन एअर होस्टेस, एक अंकल-आंटीसह सर्व जळत होते. सर्वत्र मृतदेह पडलेले होते. मला वाटले मी पण मरणार आहे. पण कसाबसा उभा राहिलो आणि धावत सुटलो. काही लोकांनी मला पकडले आणि रुग्णवाहिकेतून रुग्णालयात आणले, असे विश्वासकुमार रमेशने सांगितले.
विमान अपघातामध्ये विश्वासकुमार रमेश यांचा हात होरपळला आहे. मात्र सुदैवाने त्यांना गंभीर दुखापत झालेली नाही. काही दिवसात त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल असे एका डॉक्टरांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. दरम्यान, विश्वासकुमार रमेश यांचा जीव वाचला असला तरी त्यांचा भाऊ अजय याच्याबाबत माहिती समोर आलेली नाही.