एअर इंडियाला 9 नोटिसा, सुरक्षा नियमांचे उल्लंघन का केले?

सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल एअर इंडियाला मागच्या सहा महिन्यांत 9 ‘कारणे दाखवा’ नोटिसा बजावल्या आहेत, अशी माहिती नागरी हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज राज्यसभेत दिली.

अहमदाबाद अपघाताच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाच्या विमानांच्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त होत आहे. त्याच संबंधात राज्यसभेत काही सदस्यांनी प्रश्न विचारला होता. डीजीसीएने एअर इंडियाला देखभाल दुरुस्ती, केबिन क्रूचे वर्तन व दैनंदिन कामकाजाच्या संदर्भात काही सूचना दिल्या आहेत का, अशी विचारणा करण्यात आली होती. त्यावर राज्यमंत्री मोहोळ यांनी होकारार्थी उत्तर दिले. एअर इंडियाला बजावण्यात आलेल्या नोटिसांमध्ये सुरक्षेच्या नियमांबरोबरच इतरही बाबींचा उल्लेख करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

अहमदाबाद अपघाताची कारणे काय?

अहमदाबादेत झालेल्या विमान अपघाताचे नेमके कारण काय असा प्रश्नही राज्यसभेत विचारण्यात आला होता. त्याला उत्तर देताना मंत्र्यांनी एअरक्राफ्ट ऑक्सिडंट इनव्हेस्टिगेशन ब्युरो (एएआयबी)च्या प्राथमिक तपास अहवालाकडे बोट दाखवले. अंतिम निष्कर्ष अद्याप काढण्यात आलेला नाही. यासंदर्भात अधिक चौकशी सुरू आहे, असे मोहोळ म्हणाले.